Wednesday, December 5, 2018

संख अप्पर तहसीलसमोर शेतकर्‍यांचे उपोषण


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करूनही राज्य सरकार येथील शेतकर्यांना काहीही द्यायला तयार नाही. दोन्ही पिकांचा हंगाम वाया गेल्याने शेतकर्यावर स्थलांतर करण्याची वेळ आली असून त्यांना नुकसानभरपाई द्यावी लागेल; तसेच मागेल त्याला टँकरची तात्काळ सोय करावी आदी मागण्यांसाठी जत पूर्वभागातील नेते सोमनिंग बोरामणी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्यांनी बुधवारी संख अप्पर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

 यावेळी अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांना निवेदन दिले. या उपोषणास तालुक्यातील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते बसवराज पाटील, शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील, ज्येष्ठ नेते डॉ रवींद्र आरळी, अमृतानंद महास्वामी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बसवराज धोडमणी, चन्नाप्पा होतीॅकर, रमेश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तम्माजी कुलाळ, अंकुश हुवाळे, विक्रम ढोणे, अण्णासाहेब कोडक, बसवराज पाटील-एकुंडीकर, संजय तेली, मंगल पाटील, बिळेनसिध्द बिरादार, सिद्धाप्पा शिरसाट आदी उपस्थित होते.
जनसुराज्य पक्षाचे नेते बसवराज पाटील म्हणाले, जत तालुक्याच्या कपाळावर कायमस्वरूपी दुष्काळाचा टिळा लागला असून या तालुक्याचा प्रश्न मांडण्यासाठी तालुक्यातील एकाही आमदाराने आतापर्यंत काम केले नाही. म्हैसाळ योजनेच्या नावाखाली सत्ताधार्यांनी राजकारणाचा धंदा बंद करून तालुक्याच्या पूर्वभागातील गावात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील म्हणाले, जत तालुक्याच्या पूर्वभागातील 45 गावातील शेतकर्यांना बरोबर घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेणार आहोत. पूर्वभागातील गावागावांत पाणी आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. होर्तीकर म्हणाले, जत तालुक्यातील पुढार्यांनी आतापर्यंत राजकारणाचे नाटक केले आहे. तालुक्यातील जनता कोणाचेही मदत नसताना गेली अनेक वर्षे जगत आहे. आमदारांना आम्हीच निवडून दिले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे; मात्र पूर्वभागातील भागातील 42 गावांचा अजूनही म्हैसाळ योजनेत समावेश नाही. आश्रमाचे अमृतानंद महास्वामी म्हणाले, जत तालुक्यात भीषण दुष्काळ पडला असून या दुष्काळात शेतकर्यांची देशी जनावरे सांभाळण्याची जबाबदारी आम्ही आश्रमाच्या वतीने घेतली असून ज्यांच्याकडे देशी जनावरे आहेत. त्यांनी या आश्रमात आणून सोडावीत.
 भाजपचे नेते डॉ रवींद्र आरळी म्हणाले, जत तालुक्याच्या विकासासाठी जत तालुक्यातील भाजपचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून या योजनेचा पाठपुरावा करू. संजय तेली म्हणाले, पूर्वभागातील गावांचा अद्यापही म्हैसाळ योजनेचे नाही, हे दुर्दैवी आहे. चंद्रकांत गुडोडगी म्हणाले, शेतकर्यांच्या प्रश्नासाठी सरकार कायम संवेदनशील असून शासनाच्या मिळणार्या सर्व सोयी-सवलती तालुक्यातील गावगाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहे.

No comments:

Post a Comment