Saturday, December 8, 2018

सासऱ्याने केला जावयाचा खून

सावळीतील घटना; जावई जत तालुक्यातील बसर्गीचा!
जत,(प्रतिनिधी)-
आपल्या पोरीला मारहाण केली म्हणून जावयाला लोखंडी खांबाला बांधून सासऱ्याने जबर मारहाण केली .यात जावयाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील सावळी येथे घडली. ज्ञानेश्वर गोपाळ बामणे ( वय 40) असे या जावयाचे नाव असून तो जत तालुक्यातील बसर्गीचा आहे. या घटनेमुळे बसर्गी परिसरात खळबळ उडाली आहे.

     ही घटना मिरज तालुक्यातील सावळी येथे शनिवारी पहाटे तीन वाजता घडली. मृत ज्ञानेश्वरने लोखंडी पाईप डोक्यात घातल्याने त्याची पत्नी गीतांजली (३०) ही देखील मोठी गंभीर जखमी आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर बामणे याचा विवाह दहा वर्षापूर्वी सावळीतील अण्णासाहेब गंगाराम शिंदे यांची मुलगी गीतांजली हिच्यासोबत झाला होता. विवाहानंतर त्यांना आदित्य (११) व पार्थ (८ वर्षे) ही दोन अपत्ये झाली.
     सध्या सावळी गावात  उरुस सुरु आहे. या उरुसासाठी  ज्ञानेश्वर पत्नी व दोन मुलांसह आला होता. शुक्रवारी रात्री किरकोळ कारणावरुन त्याचा आणि पत्नी  गीतांजली यांच्यात वाद झाला. त्यानंतर तो रागानेच घराबाहेर पडला. यावेळी गावात आर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री साडेबारा वाजता तो घरी आला. यावेळी गीतांजली झोपली होती. त्याने तिच्यासोबत झालेल्या वादाचा राग मनात धरुन घरातील लोखंडी पाईप घेऊन तिच्या डोक्यात हाणली. ती जोरात किंचाळताच गीतांजलीचे वडील गंगाराम शिंदे व घरातील अन्य लोक जागे झाले. त्यावेळी ज्ञानेश्वर हातातील लोखंडी पाईप टाकून पळून जाण्याच्या प्रयत्न करीत होता.
  पळून जाणाऱ्या ज्ञानेश्वराला  गंगारामसह घरातील अन्य सर्वांनी मिळून पाठलाग करून पकडले. त्याला घराबाहेर असलेल्या  लाकडी खांबाला बांधून बेदम मारहाण केली. पहाटे तीनपर्यंत त्याला मारहाण करण्यात येत होती. यातच त्याचा मृत्यू झाला.
    नंतर गीतांजली व ज्ञानेश्वरला उपचारासाठी मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी ज्ञानेश्वरला मृत झाल्याचे घोषित केले. गीतांजलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कुपवाड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
    ज्ञानेश्वर बामणे हा जत पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न असे दोन गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment