Wednesday, December 5, 2018

जिल्हा परिषद नोकरभरतीची संख्या वाढणार


जत,(प्रतिनिधी)-
 मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर लगेचच शासनाने सुरू केलेल्या नोकरभरतीतील जागांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असुन 13 संवर्गाऐवजी आता 23 संवर्गातील रिक्त जागांची माहिती देण्याचे सुधारित आदेश शासनाने जिल्हा परिषदेस पाठवले आहेत.

काही दिवसांपूर्वी 13 संवर्गांतील; तर मागील वेळी भरतीची तयारी करताना 17 संवर्गांतील माहिती मागवण्यात आली होती. यावेळी मात्र तीन संवर्ग वगळण्यात आले आहेत. शासनाच्यावतीने रिक्त जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलेले मराठा आरक्षण कोर्टात अडकल्याने व भाजप सरकारने नव्याने आरक्षण दिले नसल्याने मराठा समाजावर अन्याय होणार होता. मराठा समाजाचे आरक्षण जाहीर करूनच नोकरभरती करा. मेगा नोकरभरतीनंतर आरक्षण देऊन काहीच उपयोग होणार नाही, अशी मागणी मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मेगा भरती थांबवली होती. अधिवेशनात 30 नोव्हेंबरला आरक्षणाचा ठराव मंजूर करण्यात आला. 1 डिसेंबरला त्यावर राज्यपालांची सही होऊन आरक्षण लागूही झाले. त्यामुळे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने सर्व जिल्हा परिषदांसह सर्वच शासकीय कार्यालयांमधील रिक्त जागांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. डिसेंबरअखेर रिक्त राहणार्या जागांची माहिती मागवण्यात आली आहे. एकूण 23 संवर्गांतील माहिती देण्याची आहे. 17 संवर्गांची माहिती देताना जिल्हा परिषदेने 450 जागा रिक्त असल्याचे कळवले होते. पुन्हा 10 संवर्गांची संख्या वाढल्याने भरतीची संख्या थोडी-फार वाढण्याची शक्यता आहे.
या संवर्गातील भरती होणार:  संवर्गातील भरती औषध निर्माता, वरिष्ठ सहाय्यक लेखा, आरोग्य सेवक पुरूष, आरोग्य सेवक महिला, कनिष्ठ आरेखक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी कृषी, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी पंचायत, लघुलेखक, कनिष्ठ लेखाधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व कनिष्ठ यांत्रिकी.

No comments:

Post a Comment