Thursday, December 13, 2018

शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा; वृक्षतोडीत वाढ


जत,(प्रतिनिधी)-
 वन विभागाच्या जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथील नियत क्षेत्र (बीट) मुख्यालयाच्या ठिकाणी वन रक्षक राहत नाहीत. मुख्यालयामध्ये राहणे बंधनकारक आहे. तालुक्याच्या ठिकाणातून बीटचा कारभार सुरू आहे.त्यांच्या दुर्लक्षाने वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा उडाला आहे.

ऑफीसची मीटिंग, राऊंड ही कामे सांगून कर्मचारी मुख्यालयाला राहात नाहीत, अशी तक्रार नागरिकांची आहे.  मुख्यालयाला राहाण्यासाठी वेगळा भत्ता दिला जातो. याबाबत ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. पूर्व भागातील वन विभागाचे मुचंडी परिमंडळातील आसंगी तुर्क नियत क्षेत्र (बीट) आहे. बीटमध्ये धुळकरवाडी, पांढरेवाडी, आसंगी तुर्क, खंडनाळ या गावांचा समावेश आहे. वन विभागाचे या बीटमध्ये 900 हेक्टर कार्यक्षेत्र आहे. लिंब, डोंगरी झाड, शिसव, खैर, हिरज, सुबाभूळ, निलगिरी, करंजी, घायपात ही झाडे आहेत. या विभागाचे संर्वधन व संरक्षण करण्यासाठी वन रक्षक सारीका दराडे म्हणून काम करीत आहेत. बीटमध्ये त्या आठवडा पंधरवड्यातून एक-दोन दिवस हजर राहतात. त्यांच्या गैरहजेरीमुळे वन विभागातील व शेतकर्यांची वैयक्तिक मालकीची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
वन विभागाच्या शत कोटी योजनेतून वृक्ष लागवड जुलै महिन्यात केली आहे. पण यातील वृक्ष कमी पाऊस व वन रक्षकाच्या दुर्लक्षाने वाळून गेली आहेत. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. आसंगी तुर्क मुख्यालयी वन रक्षकांचा मुक्काम दुर्मिळ वन विभागाकडून वन रक्षकाला बीटमध्ये मुख्यालयात राहण्यासाठी स्वतंत्र भत्ता दिला जातो. मुख्यालयामध्ये रहाणे नियमाप्रमाणे बंधनकारक आहे. मुख्यालयात राहत नसल्याने वन विभागाच्या वनसंपदा नष्ट होत आहे व शासनाचा नोकरावर खर्च केलेला मुख्यालय भत्ता वाया जात आहे. याची जिल्हा वनपाल यांनी खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

No comments:

Post a Comment