Thursday, December 13, 2018

मराठा समाजाला जातीचा दाखला मिळण्याची प्रक्रिया सुरू


 जत,(प्रतिनिधी)-
 मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेतू कार्यालयाने अर्ज दाखल करून घेण्याचे आदेश देण्यात आले असून त्याबाबतची प्रक्रिया सुरु झाली. सेतू आणि महा ई-सेवा केंद्रामध्ये दाखल्यासाठी प्रस्ताव दाखल होत आहेत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर जातीचे दाखले कधी मिळणार, याबाबतची उत्सुकता लागली होती. त्यामुळे आता जिल्ह्यातही लवकरच मराठा दाखले हातात मिळण्यास सुरवात होईल.

मागील काही वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा सुरू होता. राज्य सरकारने अखेर मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. विधिमंडळात मराठा समाज आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने मागासवर्ग समितीचा अहवाल आणि विधेयक सुद्धा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतला. यानंतर राज्यपालांनी स्वाक्षरी करून त्याचे कायद्यात रूपांतर केले आणि 1 डिसेंबरपासून राज्यात मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा लागू झाला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या विषयावर उच्च न्यायालयात राज्य सरकारची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची नियुक्ती केली आहे.
 आरक्षण मिळाल्याने मराठा जात प्रमाणपत्र मिळणेही आवश्यक आहे. त्याबाबतची उत्सुकता मराठा समाजाला लागली होती. त्यानंतर राज्य सरकारने मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबतचे आदेशही जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. जालना जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यास पहिले जात प्रमाणपत्र मंगळवारी मिळाले. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये जात प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातही जात प्रमाणपत्राबाबतची कार्यवाही चालू झाली. सेतू आणि महा ई-सेवा केंद्रांना जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव दाखल करुन घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असल्याचे सांगण्यात आले. मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर गर्दी होत आहे. जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असून सात ते आठ दिवसांमध्ये प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे.

No comments:

Post a Comment