Friday, December 7, 2018

माडग्याळ ग्रामपंचायतीचे तीन सदस्य अपात्र


जत,(प्रतिनिधी)-
माडग्याळ (ता. जत) येथील तीन ग्रामपंचायत सदस्य वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने विभागीय आयुक्तांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गतवर्षी ऑक्टोबर 2017 मध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक पार पडली होती.

 यावेळी वॉर्ड नंबर दोनमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव गटातून सुमंगला लक्ष्मण कोरे यांनी निवडणूक जिंकली होती. वॉर्ड नंबर चार मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव गटातून सुवर्णा रमेश कोरे यांनी निवडणूक जिंकली होती. या वॉर्डामधून रेखा तुकाराम कसबे अनुसूचित जाती-जमाती महिला गटातून बिनविरोध निवडून आल्या होत्या. या सर्वाना शासनाने वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते, एक वर्षाची मुदतही दिली होती. मात्र त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने विभागीय आयुक्तांनी त्यांना नुकतेच अपात्र घोषित केले आहे. यामुळे त्यांना आता ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये सहभागी होता येणार नाही. यामुळे येत्या सहा महिन्यांत रिक्त होणार्या तीन जागांवर पुन्हा निवडणूक लागणार आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. मात्र अपात्र सदस्याचे एकच धाबे दणाणले आहे.

No comments:

Post a Comment