Saturday, December 1, 2018

तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्याच्या सीमेवर


जतकरांच्या आशा पल्लवीत
 जत,(प्रतिनिधी)-
गेल्या दहा वर्षापासून जत तालुक्यात चर्चेची बनलेली आणि कर्नाटक सरकारने राबवलेली तुबची बबलेश्वर उपसा सिंचन योजना कार्यन्वीत झाली आहे. शिवाय या योजनेचे पाणी जत तालुक्याच्या सीमेवर येऊन थांबले आहे. यामुळे जतकरांच्या आशा मोठय़ा प्रमाणात पल्लवीत झाल्या आहेत. जतेचा दुष्काळ हटवण्यास महत्वपूर्ण ठरणारी ही योजना तालुकयात आणण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी शक्ती पणाला लावण्याची गरज आहे.

जत तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे चाळीस गावांना वरदान ठरणाऱया तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहातून येऊ शकते. यासाठी काँग्रेस नेते विक्रमदादा सावंत यांनी गेल्या दहा वर्षापासून मोठा प्रयत्न सुरू केला होता. यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र अशी संयुक्त पाणी परिषद देखील घेण्यात आली होती. त्यानंतर विक्रम सावंत यांनी सातत्याने या योजनेचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. गेल्या दोनच महिन्यापूर्वी विक्रम सावंत व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी दिल्लीत केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती.
कर्नाटकचे माजी पाटबंधारे मंत्री तथा आमदार एम. बी. पाटील यांनी मागच्या पाच वर्षात जवळपास तीन हजार कोटी रूपये खर्ची करून ही योजना मार्गी लावली आहे. शिवाय एम. बी. पाटील यांनीही जत तालुक्याला या योजनेतून पाणी देण्यासंदर्भात नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली होती. सुमारे पाचशे क्युसेस विसर्ग प्रवाहित होणारे कालवे, पोटकालवे पूर्ण करण्यात आले आहेत. कालव्यांचे अस्तरीकरणही पूर्ण झाले आहे. काही उपकालव्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.
दरम्यान, यंदा महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही दुष्काळाची दाहकता मोठी आहे. जतच्या सीमेवर असणारी कर्नाटकची गावे दुष्काळाने होरपळत आहेत. या लोकांच्या पाण्यासाठी तुबची बबलेश्वर योजना कर्नाटकने कार्यन्वीत केली आहे. सोळा हजार हॉर्सपॉवरचे दोन पंप सुरू करण्यात आले आहेत. असे पाच पंप योजनेवर आहेत. गेल्याच आठवडय़ात सलग पाच दिवस या योजनेतून पाणी सोडण्यात आले होते. कवटगी, गोटे कालव्यातून तिकोटा मार्गे हे पाणी जत तालुक्याच्या सीमेपर्यंत असणाऱया कर्नाटक हद्दीपर्यंत आणण्याची चाचणी घेण्यात आली. जत हद्दीवर असणाऱया समुद्रहट्टी तलावात या योजनेचे पाणी सोडण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा दुसऱयांदा या योजनेतून पाणी सोडण्यात येते आहे.
 पाणी धुळकरवाडीपर्यंत
सध्या तुबचीचे पाणी जत जवळील घोणसगी, समुद्रहट्टीपर्यंत आले आहे. हे पाणी जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहातून जत तालुक्यात येण्यास कसलीच अडचण नाही. शिवाय तिकोटा हद्दीतील शिरहट्टी वस्ती किंवा बागलकोट वस्तीपासून जत तालुक्यात प्रवेशणाऱया ओढा पात्रात हे पाणी सोडल्यास जतेच्या धुळकरवाडी, मोटेवाडीत पाणी पोहोचते. शिवाय यतनाळपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असणाऱया ओढय़ातूनही जतेत पाणी प्रवेश करू शकते. त्यामुळे यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर दोन्ही राज्यांनी समन्वय साधून निर्णय घेण्याची गरज आहे. जतला पाणी आल्यास पूर्व भागातील चाळीस गावांना दिलासा मिळू शकतो. तसेच दहा गावांच्या पाणी योजना कार्यन्वीत होऊ शकतात. शिवाय टँकर भरण्यासही मदत होणार आहे.
 प्रकाश जमदाडेंचा पाठपुरावा
जत तालुक्याच्या सीमेवर तुबचीचे पाणी आल्याचे समजताच नेते प्रकाश जमदाडे, शिव तावंशी यांच्यासह दरिबडची मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱयांनी या योजनेची तिकोटय़ापासून पाहणी केली. हे पाणी जतच्या शिवारात कोठून आणता येते, याबाबतची माहिती घेण्यात आली. सीमेवरच्या अनेक शेतकऱयांशी चर्चाही जमदाडे यांनी केली. यावेळी प्रकाशराव जमदाडे म्हणाले, अवघ्या सात किलोमीटरचे अंतर पार केले की जतेच्या पूर्व भागात हे पाणी येण्यास कसलीच अडचण नाही. नैसर्गिक प्रवाहातून हे पाणी मिळू शकते. यासंदर्भात खासदार संजकाका पाटील, आ. विलासराव जगताप यांनीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. दोन दिवसात खा. संजयकाकाही दौरा करणार आहेत. शिवाय आ. जगताप यांनी विधीमंडळात एक टीएमसी पाणी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या योजनेचे पाणी मिळेपर्यंत पाठपुरावा करणार आहोत.
 जत पूर्व भागात पाणी आणणारच : विक्रम सावंत
या योजनेवर सतत काम करणारे काँग्रेस नेते विक्रम सावंत म्हणाले, माझी भूमिका उशिरा का होईना सगळय़ांना पटली आहे. गेली दहा वर्ष या पाण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. राजकीय श्रेयापेक्षा जत पूर्व भागाला पाणी मिळणे महत्वाचे आहे. जतच्या शिवारात पाणी आणेपर्यंत थांबणार नाही. या दुष्काळात जतला पाणी मिळू शकते. कर्नाटक सरकारशी बोलणी सरू ठेवली आहे.


No comments:

Post a Comment