Monday, December 3, 2018

साठवण तलावातून बेकायदा पाणी उपसा कारणाऱयांवर कारवाई

जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना कालवा परिसरात १४४  कलम लागू करून कालवा फोडणाऱ्या  व साठवण तलावातून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून जत तालुक्यातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा असा आदेश प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला ते जत तालुका टंचाई आढावा बैठकीत बोलत होते.

    आमदार विलासराव जगताप , तहसिलदार सचिन पाटील ,गट विकास अधिकारी अर्चना वाघमळे, उपविभागीय कृषी अधिकारी के.बी.खोत, पंचायत समिती सभापती सुशिला तावंशी , प्रभाकर जाधव , नाथा पाटील इत्यादी मान्यवर व सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते . साठवण तलावातून पाणी उपसा बंदी आदेश लागू असताना बेकायदेशीर पाणी उपसा करून पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पाण्याची टंचाई निर्माण करण्याचा काही शेतकरी प्रयत्न करत आहेत .अशा शेतकऱ्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत असा आदेश प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी पाटबंधारे विभागाला दिला .
         बिळूर ( ता. जत ) येथील आरवक्की साठवण तलावातून विद्युत मोटारीव्दारे बेकायदेशीर पाणी उपसा केला जात आहे .यासंदर्भात जलसंधारण उप विभाग ( स्थानिक स्तर ) येथील शाखा अभियंता संबंधित शेतकऱ्यांच्या विरोधात जत पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आहे. अशी तक्रार या विभागाचे उप अभियंता भीमाशंकर तेली यांनी या बैठकीत केली . यावेळी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले की, पोलिसांना गुन्हा दाखल करून घ्यावा लागेल. या संदर्भात मी संबंधित विभागाला सूचना करतो तुम्ही परत जावून गुन्हा दाखल करा असे त्यांनी सांगितले .
                   पाणीटंचाई जाणवत असलेल्या  गावातील नागरिकांनी टँकरची मागणी केल्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकारी त्या गावाची पाहणी करून त्याचा अहवाल शासनाला सादर करतील त्यानंतर त्याचे सर्वेक्षण करून टँकर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे. टंचाई कालावधीत महिन्यातून दोन वेळा आढावा बैठक घेण्यात येईल .महिन्याच्या पहिल्या सोमवारी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच व शेवटच्या सोमवारी सर्व खातेप्रमुख , ग्रामसेवक व गावकामगार तलाठी यांची सयुक्तपने बैठक घेऊन पाणीटंचाई कामाचा आढावा घेतला जाईल  त्यानंतर उपाययोजना करण्यात येईल असे त्यांनी सांगितले .
       जत विज वितरण कार्यालयातील उप अभियंता संजय काळबांधे याना टंचाई कालावधीत अनेकवेळा सांगूनही कामाची पूर्तता त्यांच्याकडून  केली जात नाही. कोणताही विषय ते गांभीर्याने घेत नाहीत .दैनंदिन कामाकडे ते लक्ष देत नाहीत. पंधरा - विस दिवसातून विद्युत जनित्र ( टि .सी . ) बदलून मिळत नाही.अशी तक्रार आमदार विलासराव जगताप यांनी बैठकीत केली .विज वितरण कंपनीच्या कांही अडचणी असतील तर  त्यांनी त्या सांगणे आवश्यक आहे. अडचणी  सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही प्रांताधिकारी तुषार ठोंबरे  यानी यावेळी दिली . पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या  टँकरवर जी.पी.एस. यंत्रणा बसवून त्याचा पासवर्ड सर्वांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी प्रभाकर जाधव यांनी केली केली असता, तो पासवर्ड सर्वासाठी खुला करण्यात येईल .त्यामुळे टँकर सध्या कोठे आहे . याची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment