Thursday, December 6, 2018

शिक्षण आणि संघटित होणे हा लोकशाहीचा पाया- प्राचार्य ढेकळे

जत,(प्रतिनिधी)-
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मानवाला दिलेला महामंत्र आहे. ज्ञान आत्मसात केल्याशिवाय मानवाची प्रगती होत नाही आणि आपल्या हक्कासाठी संघटित होणे हा लोकशाहीचा प्राण आहे,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही.एस. ढेकळे यांनी केले.

     जत येथील राजे रामराव महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी प्रा. आर.बी.पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र वाङ्मयाचा अभ्यास करावा. अभ्यासाने विद्यार्थ्यांना आपल्या हक्काची व कर्तव्याची जाणीव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे, असे सांगून ढेकळे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिक्षण हा सामाजिक सुधारणेचा पाया  आहे . मानवाच्या अंगी प्रज्ञा, शिल आणि करूना हे गुण आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे . आपणास बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचले पाहिजे. त्यांच्या साहित्यातून सामाजिक भावनेचा विकास होण्यास मदत होते.
    प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य ढेकळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कुमार इंगळे यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा. डॉ सोमनाथ काळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. भीमाशंकर डहळके  व प्रा. सौ. एन. व्ही. मोरे यांनी केले.

No comments:

Post a Comment