Sunday, December 2, 2018

कडाक्याच्या थंडीने जतकरांना भरली हुडहुडी


जत,(प्रतिनिधी)-
शहरासह तालुक्यात मागील चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच सुरू होणारी ही थंडी सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरूच राहत असल्याने जतकरांना मात्र चांगलीस हुडहुडी भरली आहे. थंडीच्या बचावासाठी नागरिक अनेक उपाययोजना करताना दिसून येत आहेत.

प्रामुख्याने दसर्यानंतर सुरू होणारी थंडी यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे दिवाळी संपून एक महिना लोटत चालला तरीही सुरू झाली नव्हती. यामुळे रब्बीच्या पिकांवर विपरित परिणाम झाल्याचे जाणवत आहे. थंडी सुरू झाल्यावर रब्बीची पिके जोमाने येतात. परंतु, यावर्षी अद्यापपर्यंतही थंडीच जाणवत नव्हती. परंतु, मागील तीन दिवसांपासून थंडी सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी व सायंकाळी सातनंतर जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. प्रत्येकजण थंडीपासून बचाव होण्यासाठी उबदार कपडे परिधान करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तर शाली, डोक्याच्या टोप्या घालून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत. या कडाक्याच्या थंडीचा सर्वाधिक फटका सकाळच्यावेळी ग्रामीण भागातून शहरात दूध घेऊन येणार्या मोटारसायकलस्वारांना व सकाळच्यावेळी कामावर जाणार्यांना सहन करावा लागत आहे.
  शहरी भागातही सकाळच्या सत्रात शाळा-महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सकाळी सातच्या आतच थंडीच्या कडाक्यातच घर सोडावे लागत आहे. खासगी शिकवणीला जाणारे विद्यार्थीही सकाळच्यावेळी कुडकुडतच शिकवणी गाठत आहेत. या थंडीपासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उबदार कपड्यांची खरेदी करण्यासाठी स्वेटर विक्रेत्यांकडे गर्दी केली आहे. दुकानांमध्ये अनेक प्रकारचे स्वेटर, कोट, शाली, मफलर, गमचे, हातमोजे, पायमोजे आदी साहित्य विक्रीसाठी आले आहे.

No comments:

Post a Comment