Saturday, December 1, 2018

शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा


जत,( प्रतिनिधी)-
शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा रखडलेला आकृतिबंध मान्यता प्रक्रिया पूर्ण करून राज्यात शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या 17 हजार 255 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील शिक्षक, पदवीधर आमदारांनी तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.
या वेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर आणि प्रसन्न कोतुळकर उपस्थित होते. फेब्रुवारी 2015 मध्ये 23 सप्टेंबर 2013 च्या सुधारित आकृतिबंधातील त्रुटीबाबत समिती नेमण्यात आली होती. समितीने जुलै 2015 मध्ये त्याबाबतचा अहवाल सादर केला, मात्र अहवालावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आकृतिबंधाला मान्यता, इतर मागण्यांसाठी आझाद मैदानावर नुकतेच आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या चर्चेत आकृतिबंधाला मान्यता देण्याचा निर्णय झाला. अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसात मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन अंमलबजावणी करण्याची घोषणा तावडे यांनी केली आहे.
275 कोटींचे अनुदान जाहीर
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे तीस हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 275 कोटींचे अनुदान जाहीर झाले. त्याबाबत पुढील दोन प्रशासकीय महिन्यांत कार्यवाही पूर्ण करून अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाईल. या अनुदानाअंतर्गत 1 हजार 279 शाळांमधील 1 हजार 867 तुकड्या आहेत. त्यात 9 हजार 901 शिक्षक आणि 411 शिक्षकेतर कर्मचारी आणि 11 अर्धवेळ शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व शाळा आणि तुकड्यांना अनुदानाचा लाभ मिळेल. तसेच, 19 सप्टेंबर 2016 अन्वये 20 टक्के अनुदानप्राप्त शाळा आणि तुकड्यांना पुढील 20 टक्के अनुदान देण्यात येईल. त्यात 1 हजार 628 शाळा आणि 2 हजार 452 तुकड्यांचा समावेश असून, 14 हजार 363 शिक्षक आणि 4 हजार 884 शिक्षकेतर कर्मचार्‍यांना त्याचा लाभ मिळेल.

No comments:

Post a Comment