Monday, December 10, 2018

व्हॉट्सअ‍ॅप बनला आता सुख-दु:खाचा साक्षीदार


जत,(प्रतिनिधी)-
आजच्या वेगवान जगात सोशल मिडिया महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहे. सतत मोबाईला चिकटून असलेल्या आजच्या लोकांना घरबसल्या मित्रांच्या, आप्तांच्या तात्काळ सुख-दु:खांच्या बातम्या कळत आहेत. साहजिकच प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्याचे दिवस आता संपले असून सर्व काही निमंत्रणे ही आता सोशल मिडियाच्या बातम्यातून दिली जात आहेत. यात व्हॉटसअॅप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्रात तरी व्हॉट्सअॅपच अधिक मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे.

वेगवेगळ्या प्रकारची सुखदुःखाची निमंत्रणे देण्यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर केला जात आहे. प्रत्यक्ष घरी जाऊन निरोप अथवा निमंत्रणे देणे आता वेळेअभावी शक्य होत नाही. याला पर्याय म्हणून आमंत्रण व इतर कार्यक्रमांची पत्रिका मोबाईलवर पाठविली जात आहे. यातही टेक्स्ट मेसेजऐवजी व्हॉट्सअॅपला प्राधान्य दिले जात आहे. सोशल मीडियावर अशी निमंत्रणे व्हायरल होत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदींवरून निमंत्रणे दिली जात आहेत. दूर अंतरावरील नातेवाईक, मित्रमंडळी आपल्या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे प्रत्येकाला वाटते. पण आमंत्रण देण्याची मोठी अडचण असते. मात्र, मोबाईलवरून सर्वांपर्यंत निरोप पोहोचविण्याचे काम वेगाने होत आहे. डिजिटल व्हिडीओ स्वरुपातील पत्रिकाही सोशल माध्यमावरून फिरत आहे.
लग्नाचे 12 डिसेंबर ते 11 जुलैपर्यंत 83 मुहूर्त आहेत. अनेकांनी लग्नाची तयारी वेगाने सुरू केली आहे. मोबाईल संदेश यंत्रणेचा वापर वाढला आहे. आमंत्रणासाठी पत्रे फक्त नावापुरतीच उरली आहेत. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाच्या आमंत्रणासाठी यापूर्वी पोस्टाच्या पत्राच्या आधार घेतला जात होता. मात्र, आता आधुनिक जगात पत्रे फक्त नावापुरतीच राहिली आहेत. आयुष्यात घडणारे सकारात्मक अथवा दुःखद घटनांचे निरोप सोशल मीडियावर देण्यात येत आहेत. लग्नसोहळ्यासह कार्यक्रमांची वैशिष्ट्यपूर्ण लग्न पत्रिका छापण्याची क्रेझ काही ठिकाणी आजही आहे. राजेशाही पद्धतीच्या पत्रिका ते नव्या तंत्राच्या आधारे तयार केलेल्या आकर्षक पत्रिका दिसत आहेत.
 अँड्रॉईड मोबाईल बनला फॅशन समाजात वावरताना अँड्रॉईड मोबाईल फोन असणे फॅशन आहे. घराघरांत एकाहून अधिक मोबाईल फोन आहेत. यावर व्हॉट्सअॅप वापरण्यात सर्वचजण आघाडीवर दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप असल्याने एकाच वेळी निमंत्रणे देणे शक्य होत आहे. मित्र, नातेवाईक, व्यावसायिक मित्र, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्याचे ग्रुप आहेत. येथे कोणत्याही प्रकारचे निरोप, सुखद अनुभव, दुःखद घटना शेअर केल्या जात आहेत.

No comments:

Post a Comment