Friday, December 7, 2018

गाव रस्ता अडविल्याने सोनलगी ग्रामस्थांचे उपोषण

अखेर शिक्षण सभापती यांनी उपोषण सोडविले
जत,( प्रतिनिधी)-
गाव नकाशा वर असलेला रस्ता अडविण्यात आल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. मुलांना शाळेत जाण्यासाठी अवघड झाले असून अप्पर तहसीलदार यांनी निकाल देऊनही रस्ता काढण्यात आला नाही. हा रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा यासाठी सोनलगी (ता. जत) येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसांपासून येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर शाळकरी मुले पालकांसह उपोषणाला बसले होते.
याची गंभीर दखल घेऊन सांगली जिल्हा परिषद शिक्षण सभापती  तम्मनगौडा रविपाटील यांनी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून अखेर उपोषण सोडले.
    सोनलगी ता. जत येथे  गावाकडे जाणारा रस्ता आणाराया जगताप,केदारी जगताप व अशोक जगताप यांनी अडविला आहे. या रस्त्याची गाव नकाशावर नोंद आहे. असे असतानाही दगड मातीचा बांध घालून रस्ता अडवून तेथे बाग लावण्यात आले आहे. हा रस्ता अडवल्याने मडसेवस्तीसह परिसरात राहणाऱ्या लोकांची मोठी अडचण झाली आहे. त्यांना रस्ताच नाही. रस्ता नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना सोनलगी येथे शाळेची जाता येत नाही.
      या रस्त्याबाबत संख येथील अप्पर तहसील कार्यालयात तक्रार केल्यानंतर त्यांनी दिनांक 17 सप्टेंबर रोजी ग्रामस्थांचे बाजूने रस्ता खुला करावा, असा स्पष्ट आदेश दिला होता. त्या आदेशानुसार ग्रामस्थांनी रस्ता करण्यास गेले असता जगताप यांनी त्यांच्यावर दगडफेक करून मारहाण केली होती. याबाबत  उमदी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल आहे .   
       रस्त्याच्या प्रश्न गंभीर असल्याने गुरुवारपासून  येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लिंगाप्पा कळली, बसवराज बेडसे.  हनुमंत मडसे. पंडित तुकाराम कांबळे  यांच्यासह दुसरीपासून बारावीपर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपोषणास बसले होते. याची गंभीर दखल घेऊन सायंकाळी चार वाजता सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी,युवा नेते संजय तेली, विक्रम ढोणे यांनी तातडीने भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून  रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सरबत देऊन ग्रामस्थांचे उपोषण सोडले.

No comments:

Post a Comment