Thursday, December 13, 2018

जिल्हा परिषद कर्मचारी भरती मंत्रालयातून?

जत,(प्रतिनिधी)-
 मेगा भरतीत होणारी जिल्हा परिषदेची कर्मचारी भरती ही यावेळी प्रथमच राज्यपातळीवरून होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. संपूर्ण राज्यभर ही परीक्षा एकाच वेळी व ऑनलाईन होणार आहे. थेट मंत्रालयातून मिनी मंत्रालयातील भरती होणार असल्याने पेपरफुटी, वशिलेबाजी याला चाप बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर सरकारी कार्यालयातील रखडलेली कर्मचारी भरती चर्चेत आली आहे. शासनानेही अशी घोषणा केली असून मेगा भरतीची तयाती युध्दपातळीवर सुरू आहे. सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त जागा, बिंदूनामावलीसह भरती प्रक्रियेबाबतची तयारी करण्याची गडबड सुरू आहे.जिल्हा परिषदेतही ही लगीनघाई सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेत डिसेंबर 2018 अखेर 520 तर डिसेंबर 2019 अखेर आणखी 21 अशा दोन वर्षांत 541 जागा रिक्त असणार आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती प्रशासनाने जिल्हा परिषदेस पाठवली आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेची कर्मचारी भरती ही जिल्ह्यातच जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून होत होती. मात्र बर्याच वेळा या समितीचा अनुभव वाईट येत आहे.
मागील वेळी सांगली जिल्हा परिषदेत झालेल्या भरतीत आरोग्य सेवक भरतीचा पेपरचा फुटला. त्यामुळे या आरोपाला पुष्टी मिळाली. त्यावरून बरेच वादळ उठले. इतरही अनेक जिल्हा परिषदांमध्ये हाच अनुभव असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या ग्रामविकास विभागाने यापुढे जिल्हा परिषदेतील भरती ही एकत्रित करण्याचा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे या वेळची भरती ही राज्यपातळीवरूनच होणार आहे. संपूर्ण राज्यात एकच प्रश्नपत्रिका असणार असून परीक्षा एकाचवेळी होऊ शकते.

1 comment: