Wednesday, December 5, 2018

पाणी टंचाईसाठी सव्वा कोटीचा कृती आराखडा सादर

जत,(प्रतिनिधी)- जत तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने एक कोटी ४७ लाख ४ हजार रुपये खर्चाचा ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०१८ अखेरचा टंचाई कृती आराखडा तयार करून उपाययोजना सुरू केल्या आहेत. याशिवाय जानेवारी ते मार्च २०१९ अखेरचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करून प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. तालुक्यातील पाच गावात चार टँकरद्वारे तेरा खेपा करून सध्या पंधरा हजार ५४९ नागरिकांना मानसी विस लिटर या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. डिसेंबर नंतर तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे . जत तालुक्यात सप्टेंबर किंवा आक्टोबर महिन्यात पाऊस पडतो. मोठा पाऊस न झाल्यास यापुढील आठ दहा महीने टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनावर दैनंदिन कामाव्यतिरिक्त पाणीटंचाईच्या कामाचा जादा ताण पडणार आहे.
कोंत्येवबोबलाद , अंकलगी , व्हसपेठ, सोन्याळ ,हळ्ळी, अचकनहळ्ळी, कोणबगी, काराजनगी, सोनलगी ,सोरडी ,अंतराळ , माडग्याळ, आसंगी (जत) , तिल्याळ ,पांढरेवाडी ,लमाणतांडा (द.ब. ) , दरीबडची , मोटेवाडी (को.बो.) , निगडी खुर्द ,या एकोणीस गावातील नागरिकांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी प्रशासनाकडे सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात केली होती . परंतु प्रशासनाने त्यापैकी पाच गावातच चार टँकरद्वारे तिन डिसेंबर पासून पाणीपुरवठा सुरू केला आहे . उर्वरित चौदा गावांत टँकर सुरू करण्यात आले नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरीकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोंत्येेवबोबलाद गावाची लोकसंख्या चार हजार ३३८ इतकी असून बारा हजार लिटरच्या टँकरद्वारे येथे चार खेपा करण्यात येत आहेत . लमाणतांडा (द.ब.) गावची लोकसंख्या एक हजार ७८० इतकी असून विस हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे दररोज दीड खेप करून येथे पाणीपुरवठा करण्यात येत आहे . दरीबडची गावची लोकसंख्या तिन हजार २८२ इतकी असून २४ हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरद्वारे दररोज सव्वा दोन खेपा करून येथे पाणीपुरवठा करण्यात येत आहे .सोन्याळ गावची लोकसंख्या चार हजार ५०९ इतकी असून विस हजार लिटर क्षमतेचा टँकर दररोज साडेतीन खेपा करून पाणीपुरवठा करतआहे. व्हसपेठ गावची लोकसंख्या एक हजार ६७० इतकी असून बारा हजार लीटर क्षमतेच्या टँकरव्दारे दररोज दोन खेपा करून पाणी पुरवठा केला जात आहे. तालुक्यात दोन मध्यम प्रकल्प व २६ साठवन तलाव आहेत .त्यापैकी दोन मध्यम प्रकल्प व तीन साठवण तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे .बारा साठवण तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत तर अकरा साठवण तलावातील पाणीसाठा मृतसंचय पातळीच्या खाली गेला आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४५७.०७ मिलिमीटर इतके असून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ४८.०६ मिलिमीटर इतका अत्यल्प पाऊस येथे झाला आहे. अत्यल्प कमी प्रमाणात पडलेला पाऊस व जमीनीखालील कमी झालेली पाण्याची पातळी त्यामुळे विहिरी ,तलाव, कूपनलिका मधील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाऊ लागली आहे . पाणवठे ओस पडत आहेत. पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे .नागरिकांना प्रतिमाणसी वीस लिटर पाणी शासन देत आहे .परंतु जनावराच्या पाण्याचे काय असा प्रश्‍न ग्रामीण भागातील नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. शासनाने पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या चारा डेपो सुरू करून तेथे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांतून आता पुढे येऊ लागली आहे .जत तालुक्यातील नागरिकांनी टँकरची मागणी केल्यानंतर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन टँकर आटपाडी येथे पाठविण्यात आले आहेत .तर अन्य दोन टँकर येथेच ठेवण्यात आलेले आहेत. येथील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून शासन जनतेच्या जखमेवर मिठ चोळत आहे काय ? आटपाडी येथे टँकर पाठवण्याचा निर्णय का घेतला याबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . पाणीटंचाई संदर्भात प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन लोकप्रतिनिधींसह बैठका घेतल्या आहेत .परंतु शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या बैठका फार्स आहेत.फक्त कागदी घोडे नाचवले जात आहेत.असा आरोप विरोधकासोबत सत्ताधारी देखील आता करु लागले आहेत. पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावातील नागरिकांना टँकर मिळत नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यापासून जनतेला वंचित राहावे लागत आहे . पाण्यासाठी बायाबापड्याना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. असे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. जत तालुक्याच्या दक्षिण - उत्तर व पूर्व - पश्चिम भागातील पाणी टंचाईचा प्रश्न कायम स्वरूपात निकालात काढण्यासाठी म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करून बिरूळ कालवा क्रमांक एक व दोन आणि देवनाळ कालवा पूर्ण करून त्याद्वारे पाणी सोडल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होणार आहे .यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहेत. याशिवाय तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे ४२ ते ४८ गावात भौगोलिक असमतोल असल्यामुळे म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी तेथे जाऊ शकत नाही .यासंदर्भात कर्नाटक शासनासोबत आंतरराज्य करार करून कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी सायफपण पद्धतीने तालुक्याच्या पूर्व भागात आणून तेथील पाणी टंचाईची तीव्रता कमी करता येणार आहे. यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. तहसीलदार सचिन पाटील- टँकरची मागणी आल्यानंतर तत्काळ पहाणी व सर्वेक्षण करून आवश्यकता असलेल्या गावात टँकर सुरू केला जात आहे. नागरीकांच्या टंचाई संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्षम आहे.

No comments:

Post a Comment