Monday, December 31, 2018

शरीर संबंधास नकार देणाऱ्या विवाहितेचा खून

जत तालुक्यातील खिलारवाडीतील घटना
जत ,( प्रतिनिधी )-
खिलारवाडी (ता. जत) येथे  एका विवाहित महिलेने अनैतिक संबंध चालूच ठेवावेत, या उद्देशाने तिचा दीर  आणि त्याचा मित्र यांनी तिचा निर्घृण खून केला. तिच्या डोक्यात, पोटावर आणि तोंडावर चाकूचे वार केले. सुनीता बयाजी लोखंडे (वय 30) असे या महिलेचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली.

     जत पोलिसांनी  याप्रकरणी सुनीता हिचा दीर पांडुरंग कामू लोखंडे व त्याचा मित्र संजय कृष्णा सोलनकर (दोघेही रा. खिलारवाडी, ता. जत) यांना रात्री उशिरा अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्याकडे सोमवारी दिवसभर चौकशी सुरू होती.
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेली  माहिती अशी ः सुनीता व बयाजी लोखंडे हे खिलारवाडी गावात आई व दोन मुलांसह राहत होते. बयाजी रोजंदारीचे व मेंढपाळ म्हणून काम करतात. पती कामानिमित्त बाहेर असल्याने सुनीता लोखंडे व तिचा दीर पांडुरंग यांचे अनैतिक संबंध सुरू झाले. अनेक वर्षांपासून हे अनैतिक संबध होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी या प्रकाराची माहिती बयाजी यांना समजली होती. त्यामुळे पती-पत्नींमध्ये रोज भांडणे होत होती. त्याचा परिणाम म्हणून सुनीताने पांडुरंग याच्याबरोबर असलेले अनैतिक संबंध बंद केले. त्याच्याशी बोलणेही बंद केले होते.
त्यामुळे चिडलेल्या  पांडुरंग आणि त्याचा मित्र संजय सोलनकर  यांनी घरात भाऊ बयाजी नसल्याचे पाहून सुनिताचा  खून केला. बयाजी लोखंडे घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला.तोपर्यंत रक्तस्राव होऊन सुनिता हिचा जागीच मृत्यू झाला होता.  ग्रामस्थांनी जत पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. दोन्ही संशयितांना तातडीने अटकही करण्यात आली.  पोलिस निरीक्षक अशोक भवड  तपास करीत आहेत.
मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन
खिलारवाडी खूनप्रकरणी संशयित पांडुरंग लोखंडे व संजय सोलनकर यांनी सुनीता हिच्यावर अतिप्रसंग केल्याचा संशय गावात व्यक्‍त केला जात होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी सुनीताचा मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला होता. मात्र, खुनापूर्वी तसा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे तपासात निष्पन्‍न झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment