Tuesday, December 11, 2018

माडग्याळ भागात पाणी विकत घेण्याची वेळ

जत,(प्रतिनिधी)-
माडग्याळ (ता. जत) सह भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील गावकर्‍यांना  पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या मागणीला शासनाने केराची टोपली दाखविल्याचा आरोप  लोकांकडून होत आहे.

माडग्याळ भागात तसेच वाडीवस्तीवर पाणीटंचाई  जाणवू लागल्यापासून ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्याच्या मागणीचा प्रस्ताव  तहसीलदार कार्यालय तसेच जत पंचायत समितीकडे दिला आहे. यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे.  मंडलाधिकारी तसेच पंचायत समितीकडून या पाणीटंचाईबाबत चौकशीदेखील करण्यात आली होती.  तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी माडग्याळ येथे  पाणीटंचाईबाबत पाहणी केली होती. मात्र,  अद्यापही या भागासाठी टँकर मंजूर करण्यात आलेला नाही.  त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. दरम्यान, येत्या पाच दिवसांत माडग्याळ येथे पाण्याचा टँकर सुरू केला नाहीतर ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलनांच्या इशारा ग्रामपंचायत सदस्य जेटलिंग कोरे, सदस्या सौ. साधना सावंत, रॉयल ग्रुपचे प्रकाश सावंत, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद हाके यांनी दिला आहे.
माडग्याळ येथे गेल्या पाच महिन्यांपासून  पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रामुख्याने  सावंत वस्ती, सदाशिवनगर, रमाई कॉलनी, भीमनगर  येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचप्रमाणे गायकवाड वस्ती, कोरे वस्ती, घाटगे वस्ती, शिवनागोळ वस्ती, बंडगर वस्ती, नवटाकवाडी, कराले वस्ती, सोलनकर वस्ती, आनंदनगर, बुडकीमळा, कलदगड वस्ती, मुळीक वस्ती, मोरे वस्ती, माळी वस्ती, धुमाले वस्ती या सर्व वाड्यावस्त्यांवर तर पाच महिन्यांपासून पाणीटंचाई आहे.
लोकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.  गावात  व वाडीवस्तीवर  पाणीटंचाईमुळे  ग्रामपंचायतीने तीन महिन्यांपूर्वी तहसील कार्यालयाकडे टँकरची मागणी केली होती.

No comments:

Post a Comment