Monday, December 10, 2018

शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब आडके


जतच्या राजाराम सावंत यांना उपाध्यक्षपदी मुदतवाढ
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब आडके यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा जतच्या राजाराम सावंत यांना मुदतवाढ देण्यात आली. सांगली येथील शिक्षक बँकेत या निवडी पार पडल्या. रमेश पाटील यांनी राजीनामा दिल्याने या निवडी पार पडल्या.

यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष बाळासाहेब आडके म्हणाले, स्वतःच्या अवघ्या दीड वर्षांच्या कार्यकाळात नियम डावलून, दिशाभूल करून 27 कामगारांची भरती करणार्यांना, कर्जाचे दर वाढवणार्यांना बँकेच्या चांगल्या कारभारावर बोलण्याचा अधिकारच नाही. सत्तेची स्वप्ने धुसर होऊ लागल्यानेच विरोधी गटाकडून मनमानी प्रकारे खोटे आरोप केले जात आहेत. सभासदहिताचे, सभासदांना न्याय देणारेच निर्णय याही पुढे घेतले जातील. ज्यांनी यापूर्वी केवळ दीड वर्षांच्या कार्यकाळात मनमानी पध्दतीने नियम डावलून चुकीच्या पध्दतीने क्षमता न पाहताच स्वतःच्या 27 सग्यासोयर्यांची भरती केली तेच स्वतःचे पाप लपवण्यासाठी आमच्यावर खोटेनाटे आरोप करीत आहेत. त्यांच्या सत्ताकाळात 13.50 टक्क्यांच्याही पुढे नेलेला कर्जाचा व्याजदर 12 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. शिवाय सभासदांचा लाभांशही वाढवला आहे. काटकसरीचा कारभार करीत उधळपट्टीला पायबंद घातला आहे. किरण गायकवाड म्हणाले, बँकेचा व रुग्णालयाचा काहीही संबंध नाही, तरीही शिक्षक संघाचे (थोरात गट) चुकीच्या पध्दतीने आरोप करीत आहे. या चांगल्या उपक्रमात सर्वांनीच सहभागी व्हावे, असे आवाहन आपण केले. मात्र ते न करता केवळ टीका-टिप्पणीच करीत आहेत.
 शशिकांत भागवत म्हणाले, बँकेची गरज म्हणूनच कार्यक्षेत्र वाढीचा निर्णय घेतला. त्यालाही विनाकारण खोडा घालण्याचा प्रयत्न केला. अगदी हायकोर्टापर्यंत धाव घेतली. मात्र कोर्टानेही त्यांना फेटाळून लावले आहे. विरोधी गटाच्या पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष व त्यांची पत्नी असे दोघांचेही कर्ज थकीत आहे आणि तेच थकबाकीबाबत आरोप करतात, हे हास्यास्पद आहे. शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड काल संचालक मंडळाच्या बैठकीत झाली. सत्ताधारी शिक्षक समितीच्या बाळासाहेब आडके यांना 14, तर विरोधी थोरात गटाच्या महादेव हेगडे यांना 7 मते मिळाली. उपाध्यक्षपदी राजाराम सावंत यांनाच मुदतवाढ देण्यात आली. यावेळी शिक्षक नेते किसन पाटील, शिक्षक समितीचे अध्यक्ष बाबासाहेब लाड, माजी अध्यक्ष सयाजी पाटील,सरचिटणीस दयानंद मोरे, संचालक यू. टी. जाधव, सुनील गुरव, तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, श्रीकांत माळी, महादेव माळी, हरिबा गावडे यांच्यासह सर्व संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment