Tuesday, December 4, 2018

जत तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे चटके लोकांना बसू लागले आहेत. मात्र प्रशासनाने या टंचाईकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. याबाबत वेळेत उपाययोजना नाही केल्यास जनावरांची उपासमार व मोठ्या संकटांना सामना करावा लागणार आहे.

पावसाळ्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे आतापासूनच तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी त्यासंबंधी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत; तर प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. नेते मंडळी बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात रब्बी हंगामातील 70 गावांची पीक आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. ऑक्टोबरमधील आणेवारीनुसार खरीप हंगामातील सर्वच गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. यामुळे शासनाने या सर्वच गावांत दुष्काळ जाहीर केला आहे. अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाही, चारा नाही. रब्बी पूर्णपणे वाया गेलेला आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून दुष्काळ जाहीर होऊनही पुरेशी मदत होताना दिसत नाही. शासनाच्या कारभारामुळे दुष्काळी 70 गावांना मदतीपासून वंचित राहावे लागणार काय, असा सवाल केला जातो आहे. परंतु शासनाने वंचित राहू नये म्हणून सर्व्हे काटेकोरपणे करून तात्काळ मदत करणे गरजेचे आहे.
जत तालुक्याच्या पश्चिम भागातम्हैसाळचे पाणी आलेली गावे वगळल्यास अन्य गावांत सन 1972 पेक्षाही भीषण दुष्काळी स्थिती आहे. ही गावे दुष्काळाने होरपळून निघत आहेत. मात्र शासनदरबारी केवळ 30 टक्के भागातच दुष्काळी परिस्थिती आहे. ‘म्हैसाळचे पाणी आलेल्या गावांचाही यात समावेश आहे. पिण्याचे पाणी, चारा टंचाई गंभीर झाली आहे. रब्बी पिकांची तर पेरणीच झालेली नाही. काही भागात 25 ते 30 टक्के पेरणी झाली होती. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने 15 दिवसातच पिके करपून गेली. दुष्काळी परिस्थिती आहे त्या गावात पाण्यासाठी टँकर सुरू करणे गरजेचे आहे. चारा टंचाई आहे. तरी देखील या रब्बी हंगामातील गावांत दुष्काळ जाहीर करायला दिरंगाई केली पण उपयोजना करायला दिरंगाई केली जात असल्याचे गणी मुल्ला यांनी आरोप केला.
जत तालुक्यात दुष्काळ असला तरी लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी याकडे दुर्लक्ष करत आहेत. शासनाने दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत द्यावी. मागणी येईल तिथे पाण्याचे टँकर सुरू करण्याची गरज आहे. जत तालुका विस्ताराने सर्वात मोठा आहे. तालुक्यात महसूली 123 गावे आहेत. तालुक्याचे क्षेत्रफळ 2 लाख 24 हजार 824 हेक्टर आहे. लागवडीखालील क्षेत्र 1 लाख 58 हजार 700 हेक्टर आहे. खरीप क्षेत्र 65 हजार 700 हेक्टर, रब्बी क्षेत्र 93 लाख 300 हेक्टर आहे. मुलकी पड क्षेत्र 1 हजार 970 हेक्टर आहे. बागायत एकूण क्षेत्र 22 हजार 75 हेक्टर, तर जिरायत क्षेत्र 62 हजार 299 हेक्टर आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 427.5 मि. मी. असून ज्वारी, बाजरी, मका व कडधान्य आदी प्रमुख पिके आहेत.
शासनाच्यावतीने दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रांत, तहसीलदार, अप्पर तहसीलदार यांनी दुष्काळ पाहणी चालू केली असून उपाययोजनेवर भर दिला आहे.आता तालुक्यात 5 गावांत टँकर चालू झाले आहेत.पण आणखी पाण्याचे टँकर सुरू करण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment