Tuesday, December 11, 2018

पालिका कर्मचाऱ्यांना आरोग्य किट वाटप

 जत,(प्रतिनिधी)-
जत नगर पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन  गरज लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने त्यांना  कामासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू मोफत वाटप केल्या आहेत .या वस्तूचा उपयोग नित्यनियमाने करून आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन  नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार यांनी केले .

 नगरपालिकेच्यावतीने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मोफत बुट, हँडग्लोज , मास्क , जिकीट व साबण इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले .यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या . जत शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवणाऱ्या पालिकेतील आरोग्य  कर्मचाऱ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे व ते निरोगी राहावेत म्हणून त्यांची सहा महिन्यातून एक वेळा मोफत आरोग्य तपासणी पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांचा विमा उतरवून त्यांच्या कुटुंबातील इतरांचे जिवन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे .जत नगरपालिका प्रशासन आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुख दुखात सतत सहभागी असते. कर्मचाऱ्यांनी आपले काम नित्यनियमाने करून पालिका प्रशासनाला सहकार्य करावे .असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जत शहरातून दररोज १२ टन कचरा निघतो या कचऱ्याचे निर्मूलन करण्याचे काम आरोग्य कर्मचारी करतात. शहरातील कचऱ्याची प्रक्रिया करण्याचा प्रकल्प जत ते निगडी रस्त्यावर जतपासून सुमारे चार  किलोमीटर अंतरावरील दहा एकर जागा प्रस्तावित करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प सुमारे सात कोटी रुपयाचा असून शासन स्तरावर मंजुरीच्या अंतिम प्रतीक्षेत आहे .या प्रकल्पातून कंपोस्ट खत तयार करून त्याची विक्री करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर नगरपालिकेला यातून आर्थिक उत्पन्न मिळू शकेल असा आत्मविश्वास नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार यांनी यावेळी व्यक्त केला.
 या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार ,आरोग्य समिती सभापती लक्ष्मण एडके, नगरसेवक भूपेंद्र कांबळे ,माजी नगराध्यक्ष इकबाल गवंडी, नगरसेवक  स्वप्नील शिंदे , संतोष कोळी ,व सुजय शिंदे , प्रवीण जाधव , अरुण साळे ,पांडू मळगे ,पप्पू माळी, श्रीकांत शिंदे इत्यादी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment