Wednesday, January 2, 2019

10 वी,12 वीच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याची पद्धत जाहीर

जत,(प्रतिनिधी)-
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या दहावी, बारावीच्या क्रीडा क्षेत्रात तसेच  एन.सी.सी, स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानसार विद्यार्थ्यांना द्यायची गुणांची सवलत मार्च 2019 मध्ये होणार्‍या इ. 10 वी आणि इ. 12 वीच्या परीक्षांपासून लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

    14 ते 16 वर्षांखालील गटात इ. 6 वी पासून इ. 10 वीपर्यंत केव्हाही जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडू विद्यार्थ्यास दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्यात येतील. क्रीडा प्रमाणपत्रावर विद्यार्थी कितव्या इयत्तेत असताना खेळला, त्या इयत्तेचा उल्लेख असावा. इ. 10 वी पूर्वी विद्यार्थ्याने प्राविण्य मिळविलेले असले तरी, सवलतीचे गुण मिळण्याकरिता त्या विद्यार्थ्याने इ. 10 वी मध्ये क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
    18 वर्षांखालील गटात म्हणजेच इ. 6 वीपासून इ. 12 वीपर्यंत केव्हाही जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडू विद्यार्थ्यास सवलतीचे गुण देण्यात येतील. क्रीडा प्रमाणपत्रावर विद्यार्थी कितव्या इयत्तेत असताना खेळला त्या इयत्तेचा उल्लेख असावा.
     12 वी पूर्वी विद्यार्थ्याने प्राविण्य मिळविलेले असले तरी, सवलतीचे गुण मिळण्याकरिता त्या विद्यार्थ्याने इ. 12 वी मध्ये क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. खेळाडू विद्यार्थ्याने इ. 6 वी ते इ. 10 वी या कालावधीत प्राविण्य मिळविलेले असेल व याकरिता असलेल्या सवलतीचे गुणांचा लाभ एकदा घेतला असेल, तर त्याला पुन्हा इ. 12 वीकरिता याचा लाभ घेता येणार नाही. मात्र, या खेळाडू विद्यार्थ्याने इ.11 वी व इ. 12 वी मध्ये प्राविण्य, सहभाग घेतला असेल तर त्याला गुण दिले जातील.
    त्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शैक्षणिक वर्षात दि.1 जानेवारी ते 5 एप्रिल पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत. जे खेळाडू इ. 10 वी व इ. 12 वी या इयत्तेपूर्वी खेळलेले असतील त्यांचे प्रस्ताव जानेवारी मध्येच जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर करावेत. संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, त्या शैक्षणिक वर्षातील प्रस्ताव दिनांक 30 एप्रिल पर्यंत संबंधित विभागीय मंडळ कार्यालयास शिफारशींसह सादर करावेत, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment