Monday, January 7, 2019

जत तालुक्यात 13 गावे,106 वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात पाणीटंचाईची भीषणता वाढत असून सध्याच्या घडीला 13 गावे आणि 106 वाड्यावस्त्यांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. अजूनही सुमारे 35 गावांना पाण्याची ट्ंचाई जाणवत असून प्रशासन अन्य उपाययोजना करण्यात गुंतली असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

अनेक गावांना आठ आठ दिवसांतून पाणी पुरवठा होत आहे. संख, अंकलगी, माडग्याळ अशा अनेक गावांचा यात समावेश आहे.जत शहरादेखील आठवड्यातून दोन दिवसच पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे लोकांना पाणी साठवण्यावर भर द्यावा लागत आहे.त्यामुळे पाण्याच्या सिमेंट टाक्या, प्लॅस्टिक बॅरेल, प्लॅस्टिक घागरी यांच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या जत तालुक्यात कोंतेबोबलाद, दरिबडची, लमाणतांडा (दरिबडची), व्हसपेट, सोन्याळ, एकुंडी, तिकोंडी, आसंगी (जत), करेवाडी (को.बो.), माडग्याळ, जाडरबोबलाद, निगडी खुर्द, अचकनहळ्ळी, सालेगिरी, पाच्छापूर या गावांसह त्यांच्याखालील 106 वाड्यावस्त्यांनादेखील टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
आणखी 10 गावांचे प्रस्ताव आले असून त्यासंदर्भात चौकशीचे काम तसेच अन्य पर्याय यांचा शोध घेतला जात आहे. अन्य स्त्रोत न मिळाल्यास टँकर सुरू केले जाती, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. मात्र पाणीटंचाई असूनदेखील अनेक गावकारभार्यांनी पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, या गावांमधील नागरिक पाण्यासाठी ओरड करीत आहेत.

No comments:

Post a Comment