Saturday, January 5, 2019

जत तालुक्यातल्या 45 हजार लोकांना टँकरने पाणी

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बारा गावे व त्याखालील १०६  वाड्या-वस्त्यांना चौदा खाजगी टॅकरद्वारे मानसी वीस लिटर प्रमाणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मार्च , एप्रिल व मे महिन्यात टँकरच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे .प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन सर्व त्या उपाययोजना केल्या आहेत . सध्या ४४ हजार ६२ नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.

     कोंत्येवबोबलाद , दरीबडची ,लमाण तांडा ( द. ब. ) , व्हसपेट ,सोन्याळ ,तिकोंडी गावठाण व वाडी वस्ती , आसंगी (जत ) गावठाण व वाडी वस्ती , माडयाळ गावठाण व वाडी वस्ती , जाडर बोबलाद गावठाण व वाडी वस्ती , निगडी खुर्द , एकुंडी , करेवाडी ( को .बो. ) या ठिकाणी सध्या टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे .या चौदापैकी दहा गावात अंकलगी ( ता.जत ) साठवण तलावातून टँँकर भरून घेऊन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या अंकलगी तलावात पाणीपुरवठा करण्याइतपत समाधानकारक पाणीपुरवठा उपलब्ध असल्यामुळे अंकलगी साठवण तलाव पूर्व भागातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा केंद्रबिंदू ठरला आहे.
     सालेकिरी ( पाच्छापुर ) , येळवी ,जालीहाळ बुद्रुक ,अचकनहळ्ळी , खोजानवडी ,या सात गावात सद्या तीव्र स्वरूपात पाणी टंचाई जाणवत आहे .पाणीपुरवठा करण्यात येणारा स्तोत्र पूर्णपणे कमी झाला आहे .त्यामुळे या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे . प्रशासनाने  टँकर मंजुरीचा प्रस्ताव तयार करून प्रांताधिकारी जत यांच्याकडे सादर केला आहे . टँकर मंजूर झाल्यानंतर येथे त्वरित टँकर सुरू करण्यात येणार आहे .
      बालगांव , बेळोंडगी , सोनलगी ,बसर्गी , बागलवाडी ,सोन्याळ गावठाण ,कुणीकोनूर गावठाण व वाडी वस्ती ,शेड्याळ , आवंढी , खैराव या दहा गावातील नागरिकांनी टँकद्वारे पाणीपुरवठा   करण्यात यावा अशी मागणी जत पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे . तहसीलदार सचिन पाटील ,पंचायत समिती  गट विकास अधिकारी अर्चना वाघमळे ,पाणीपुरवठा उपअभियंता एस. एस. कोराळे यांनी या गावाची प्रत्यक्ष पाहणी करून  टँकर मागणीचे प्रस्ताव तयार केले आहेत . पांढरेवाडी , तिल्ल्याळ , धुळकरवाडी या तीन गावातील नागरिकांनी  टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली होती . परंतु प्रशासनाकडून सदर तीन गावाची पाहणी केल्यानंतर सध्या पिण्यापुरता पाणीसाठा गावात उपलब्ध असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्या  निदर्शनास आले आहे .त्यामुळे या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार नाही . असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे . भविष्यात या गावातील पाण्याचा स्तोत्र कमी झाल्यानंतर त्याची पाहणी करून येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल असे उप अभियंता एस. एस. कोराळे यांनी सांगितले.
      जानेवारी महिन्यात टँकरची संख्या चौदा इतकी असून तालुक्‍यातील  २५ टक्के नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे .मार्च ,एप्रिल , मे या महिन्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढणार असून तालुक्याच्या उत्तर भागातील समारे विस ते पंचवीस  गावे वगळता इतर भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे . सर्वसाधारण जूनपर्यंत पावसाळा सुरू होतो . परंतु जून महिन्यात जत तालुक्यात  पाऊस  पडत नाही. सर्वसाधारण ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान येथे पावसाळा सुरू होतो त्यानंतरच पाणी व चारा टंचाईची तीव्रता कमी होते . त्यामुळे आणखी  आठ ते नऊ महिने  तालुक्यातील नागरिकांना तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे . या कामाचा अतिरिक्त ताण प्रशासनावर पडणार आहे.
       भौगोलिक असमतोल व अत्यल्प कमी प्रमाणात पडणारा पाऊस त्यामुळे जत तालुक्यात  प्रत्येक वर्षी पाणीटंचाई जाणवत असते . प्रशासनाचे प्रत्येक वर्षी पाणीटंचाईवरील उपायोजना करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत . म्हैसाळ  उपसा जलसिंचन योजना व कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेसाठी  पाणी टंचाईवर होणारा  अनावश्यक निधी खर्च करून तालुक्यातील  नागरिकांना कायम स्वरूपात पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे . त्यामुळे शासनाचा प्रत्येक वर्षी होणारा अनावश्यक खर्च वाचणार आहे . याशिवाय प्रशासनावरील कामाचा ताण कमी होणार आहे. यासाठी राजकीय पाठबळ व इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.
        सध्या वातावरणात बदल होऊ लागले आहेत .त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी दिवसेंदिवस  खाली जात आहे. विंधन विहिरी , साठवण तलाव , ओढे - नाले यातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे . प्रशासनाने पाणी उपसा बंदी आदेश लागू केला असला तरी राजकीय लागेबांधे असलेले लोक राजकीय दबावतंत्राचा उपयोग  करून बेकायदेशीर पाणी उपसा करत आहेत . त्यामुळे भविष्यात त्या भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे . शासनाने पाणी उपसा बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.
      पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी केल्यानंतर तात्काळ त्या गावाला भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आवश्यकता वाटत असल्यास टँकरचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी सादर केला जात आहे. अशी माहिती जत पंचायत समिती गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे व तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

(  सोबत अंकलगी ( ता. जत ) येथील साठवण तलावातील पाणीसाठा व  पाणी भरत असलेला टँकर )

No comments:

Post a Comment