Thursday, January 3, 2019

59 मिनिटांत 1 कोटी कर्ज प्रकरण;151 कोटी मंजूर


सांगली,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिकांना (एमएसएमई) एक कोटींपर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात 240 प्रकरणांमध्ये 151 कोटी, तर देशपातळीवर 1 लाख 12 हजार प्रकरणांमध्ये 37 हजार 412 कोटी रुपये कर्जे मंजूर झाली. जिल्ह्यात यापैकी 25 प्रकरणांमध्ये 12 कोटी तर देशपातळीवर 40 हजार 669 प्रकरणांमध्ये 14 हजार 088 कोटी वितरित रुपये करण्यात आले. या योजनेस प्रतिसाद चांगला आहे. या योजनेचा फायदा व्यावसायिकांनी घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय केंद्रीय जीएसटीचे सहायक आयुक्त नानल यांनी मिरज येथे आयोजित चर्चासत्रात केले.

 हे चर्चासत्र केंद्रीय जीएसटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक, तसेच सांगली जिल्हा व्यापारी आघाडी यांच्या सहयोगाने आयोजित केले गेले. यावेळी दिनेश नानल, सांगली जिल्हा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष गजेंद्र कल्लोळी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वसंत सराफ, केंद्रीय जीएसटी निरीक्षक राजेंद्र मेढेकर, बँक अधिकारी पी. आर. मिठारे, जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी एम. आर. मेडीदार उपस्थित होते. नानल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) क्षेत्रास सक्षम करण्यासाठी 2 नोव्हें. 2018 रोजी विविध योजनांची सुरुवात केली असून या व्यावसायिकांना 59 मिनिटांत 1 कोटींपर्यंत कर्ज मिळविण्याची सुविधा काही अटींवर सुरू झाली आहे.
 देशपातळीवर 80 जिल्ह्यांत हा कार्यक्रम सुरू असून त्यात सांगली जिल्ह्याची निवड झाली आहे. जिल्ह्यातील अन्नप्रक्रिया क्षेत्रावर या योजनेचा भर राहणार आहे. यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करण्यात येत असून या व्यावसायिकांना या सर्व प्रक्रियेची माहिती व्हावी, या दृष्टिकोनातून व्यावसायिकांच्या असोसिएशनच्या सहयोगाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे. गजेंद्र कल्लोळी म्हणाले, 59 मिनिटांत कर्ज योजनेबरोबरच अनेक सुविधांसह हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून देशातील सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योगाना सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने अभ्यासपूर्वक योजना आणल्या असून जिल्ह्यातील व्यावसायिकांना या योजनांचा फायदा होत आहे.
सांगली जिल्ह्यातील अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत. वसंत सराफ म्हणाले, ही योजना सध्या सुरू असलेल्या व्यवसायांसाठी असून जीएसटी नोंदणी, मागील 3 वर्षांचे इनकम टॅक्स विवरणपत्र व मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट यांची पूर्तता करून व्यावसायिकांना या कर्ज योजनेचा लाभ घेता येईल. यावेळी एम. आर. मेडीदार, पी. आर. मिठारे आदींची भाषणे झाली. राजेंद्र मेढेकर यांनी सूत्रसंचालन केले. अनंत बिळगी यांनी आभार मानले. यावेळी संजय महाजन, बंडू शेटे, विरांजन कद्दू, अशोक शहा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment