Tuesday, January 1, 2019

सत्यम फाउंडेशनच्यावतीने महादेव विद्यालयास क्रीडा साहित्य भेट

जत,(प्रतिनिधी)-
 गेल्या तीन वर्षांपासून समाजकार्यात कार्यरत असलेल्या सत्यम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वर्षाअखेरच्या पार्ट्यांना फाटा देत रावळगुंडवाडी (ता. जत) येथील  महादेव विद्यालयास क्रीडा साहित्य भेट देऊन एक आगळा-वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजे रामराव महाविद्यालयाचे प्रा. समीर शेख व नामदेव जवंजाळ उपस्थित होते.

 सत्यम फाउंडेशनचे सर्व सदस्य हे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. सत्यम फाउंडेशनने यापूर्वी मूकबधिर शाळेस श्रवण यंत्रे भेट दिली आहेत. या शिवाय करिअर गायडन्स, व्याख्यान, वृक्षारोपण, मतिमंद शाळेस मदत यासारखे उपक्रम हाती घेतले आहेत. सोबतच येत्या काळात काही हुशार व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक जबाबदारी उचलण्याचा मानस असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सत्यम फाउंडेशन संस्थेतर्फे संतोष गडीकर, सागर कागवडे, सचिन बडुर, प्रमोद खोत, अमित हगलंबे, साईनाथ हिरगोंड, उदय पाटील यांसह अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी रावळगुंडवाडी, उंटवाडी गावातील सरपंच,उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment