Monday, January 7, 2019

गुगवाडच्या नागरिकांची पाण्यासाठी रानोमाळ भटकंती


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील दक्षिण भागातले शेवटचे गाव असलेल्या गुगवाडला पिण्याच्या पाण्याची तीव्र ट्ंचाई जाणवत असून तात्काळ टँकरने पाणी पुरवठा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या गावातल्या नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

नागरिकांच्या पाण्याच्या गरजेसह जनावरांच्याही पाण्यासाठी गावाला रोज 80 हजार लीटर पाण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीकडून राबवण्यात येत असलेल्या पाणी योजनेचे पाण्याचे स्त्रोत अटल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या गावाला 15 दिवसांतून फक्त आठ हजार लीटर पाण्याचा पुरवठा होत आहे.प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपाचे अल्प पाणी असलेल्या कुपनलिकेला अधिग्रहीत करून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाला ही यंत्रणा अत्यंत तोकडी पडत आहे. शाळांच्या मध्यान्ह भोजनावरही याचा परिणाम झाला आहे. हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याची गरजदेखील वाढू लागली आहे. प्रशासनाने तातडीने टँकरने गावाला पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आम्दोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment