Sunday, January 6, 2019

रस्ता सुरक्षितता कायम व्हावी..


जत,( प्रतिनिधी)-
ओव्हर स्पीड, ओव्हर कॉन्फिडन्स, ओव्हर टेकींग, ओव्हर लोड, ओव्हर इटिंग टाळून स्लो, स्टेडी व सुरक्षिततेचे पालन प्रत्येक वाहनचालकांने केले तर नक्कीच प्रवास सुरक्षित होईल. सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्त्यावरील वाढलेली वाहनांची संख्या त्यामुळे सहाजिकच वाढलेले अपघात, त्यात होणारे मृत्यू विचारात घेता राबविण्यात येणारी सुरक्षितता मोहीम निश्चितच स्तुत्य आहे. मात्र, त्याचे पालन केवळ पंधरवड्यापुरते अथवा अभियानापुरते सीमित न राहाता सर्वांकडून कायम होणे आवश्यक आहे.

मोटारसायकल असो वा अन्य कोणतेही वाहन असो चालकाने वेगावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळले पाहिजे. रस्त्यावरील नियमांचे पालन प्रत्येक वाहनचालकाने करण्याची आवश्यकता आहे. वाहनांची वेळोवेळी देखभाल-दुरूस्तीची कामे केली पाहिजेत. व्यसनी पदार्थांचे सेवन खात्रीपूर्वक टाळले पाहिजे. अपघातामुळे मनुष्यहानी होते. माणसाचा जीव हा अनमोल आहे. त्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालवण्याची आवश्यकता आहे.
तालुक्यांमधील  मार्गांवर अवैध वाहतूक मोठया प्रमाणावर सुरू आहे. अवैध किंवा खासगी वाहने भरधाव वेगाने हाकण्यात येतात. गाडीतील प्रवाशांचे प्राण महत्वाचे आहेत, याची जाणीव ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षात रस्त्यावरील वाहनांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे. त्याचबरोबर अपघाताच्या संख्येतही वाढ झाली आहे. चूक नसतानाही अपघातात नाहक प्राण गमवावे लागतात. त्यामुळे शासनाकडून सुरू असलेली रस्ता सुरक्षितता मोहीम विशिष्ट कालावधीपुरती सीमित न राहता, ती अखंड चालू ठेवली पाहिजे.
वाहनांची तपासणी वेळच्यावेळी करावी. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच वाहन चाचणीत गुणात्मक सुधारणा करण्याबरोबरच फॅन्सी नंबरप्लेट, कर्णकर्कश्य हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणे यावर प्रतिबंध आणण्यासाठी वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अरूंद रस्त्यावरून सुसाट वेगाने, धूमस्टाईल पध्दतीने गाड्या हाकणे याला प्रतिबंध होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment