Wednesday, January 9, 2019

जत तालुक्यातील दोघा शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारे  राज्यस्तरीय क्रांतीज्योती गुणवंत शिक्षक पुरस्कार  जत तालुक्यातील दिलीपकुमार हिंदुस्थानी व गुंडा मुंजे या दोन्ही उपक्रमशील शिक्षकांना  नाशिक येथे झालेल्या  कार्यक्रमात  प्रदान करण्यात आला. नाशिक येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा वितरण  सोहळा पार पडला.

  सदर पुरस्कार वितरण समारंभासाठी राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ राज्य सरचिटणीस  राजेंद्र म्हसदे राज्यनेते जीवन कांबळे,प्रसिद्ध शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी, नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षा शितलताई सांगळे, मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण जी. राऊत, रामचंद्र जी. जाधव शिक्षण उपसंचालक नाशिक, इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी  सौ.जगताप, सांगलीहून  राज्यउपाध्यक्ष संतोष काटे, लखन होनमोरे, सिद्धाणा शिंगे,बसु पूजारी,संदीप कांबळे,तालुकाध्यक्ष-सुनिल सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

गुंडा मुंजे हे  जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा संख येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असून उच्च शिक्षित असून त्यांनी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत तालुक्यात साधनव्यक्ती म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे. विभागीय आणि जिल्हास्तरावर विविध प्रकारचे प्रशिक्षण घेऊन ते अनेक वर्षांपासून शिक्षकांना प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून देण्याचे काम केले आहे. तसेच त्यांनी लोकसहभागातून शाळा खोल्यांचे बांधकाम करून  दुर्गम भागातील मुलांना एक चांगली संधी उपलब्ध करून शिक्षणाची सोय केली आहे.दिलीप हिंदुस्थानी हे जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा पाटीलवस्ती करजगी येथे साहाय्यक शिक्षक म्हणून सेवेत असून उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न केले आहे. तसेच सामाजिक बांधिलकीतुन त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली आहे. शिवाय त्यांनी विध्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य विषयक जनजागृती,  विविध राष्ट्रीय कार्यक्रमातील सहभागाची  दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.               
  चांगल्या शिक्षकांचे शंभर वर्षानंतरही नाव निघते-हेरंब कुलकर्णी 
यावेळी शिक्षण विचारवंत हेरंब कुलकर्णी यांचे 'शिक्षणाच्या सक्षमीकरणात शिक्षकांची भूमिका' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी कुलकर्णी म्हणाले की, आजच्या शिक्षण पद्धतीत विचार करण्याची प्रक्रियाच विध्यार्थ्यांना शिकवली जात नाही. रेडिमेड विचार करायला आम्ही शिकवत आहोत. त्यामुळे बंडखोर व विद्रोही मुले तयार होण्याऐवजी भित्री मुले तयार होत आहेत. शिक्षकांनी फेसबूक,पासबूक व चेकबुक बाजुला सारून विद्यार्थ्यांना आपली मुले समजून उपक्रमशील शिक्षण देण्याची गरज आहे.
     शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करताना निराश होण्याची गरज नाही. चांगल्या शिक्षकांचे शंभर वर्षानंतर ही नांव निघते. हे त्यांनी उदाहरण देऊन पटवून दिले. आपला समाज गुणांची कदर करणारा आहे. तो आरशासारखा आहे.आपण चांगले काम केल्यास समाज आपल्याला स्वीकारतो.मुलांना जे येतं ती मोजण्यासाठी फुटपट्टी आपल्या शिक्षणात नाही. त्यामुळे बदलण्यासाठी व 'ती' आपली वाटत असतील तर तुम्ही जे काही कराल ते शिक्षणाचे उपक्रम असेल. वाचनामुळे ज्ञानाची ताकत येते. त्यामुळे आपल्याला कुणीही चिरडू शकत नाही. म्हणून नवीन वर्षात वाचनाची सवय लावा.यासाठी दररोज २५ते ५० पाने वाचण्याचा संकल्प करावा असे आव्हान शिक्षणतज्ञ कुलकर्णी यांनी केले.

No comments:

Post a Comment