Thursday, January 3, 2019

इतरांवर टीका करण्यापेक्षा पक्ष बळकट करा


रासपच्या मेळाव्यात महादेव जानकरांचे आवाहन
सांगली,(प्रतिनिधी)-
 रासपचा झेंडा घेऊन फिरणाराच केवळ आपला, ही भूमिका कायम ठेवून आपली औकात चौकात दाखवा, असे निर्देश राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले. राष्ट्रीय समाज पक्षाची सांगलीत औकात झिरो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उगीच दुसर्यांवर टीका करीत बसण्यापेक्षा पक्ष बळकट करण्यास प्राधान्य द्यावे. जानकर आल्यावर फक्त गर्दी करायची, ही नाटकं आता बंद करा, असे सांगत श्री. जानकर यांनी पदाधिकारी यांची चांगलीच हजेरी घेतली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात जानकर बोलत होते.

व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतळे, जिल्हाध्यक्ष मारुती सरगर आदी उपस्थित होते. उगीच टाळ्या वाजवू नका पक्ष वाढविण्यासाठी काम करा असे सांगून जानकर यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली. मेळाव्यास उपस्थिती कमी होती. त्यावर नाराजी व्यक्त जानकर यांनी नाराजी व्यक्त केली. व्यासपीठावर गर्दी आणि खुर्च्या रिकाम्या असे दृश्य दिसल्यानेच मी खाली खुर्चीवर बसलो होतो. दुसर्यांवर टीका करण्याएवढे आपण या जिल्ह्यात मोठे नाही, याची जाण कार्यकर्त्यांनी ठेवणे गरजेचे आहे. पोलिंग बूथ मजबूत केल्याशिवाय काहीही होणार नाही. जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसची काय अवस्था होती आणि आज काय अवस्था आहे, याचा अभ्यास करा. भाजप देशात वाढत चालली आहे, यामागे अमित शहांचा त्याग आहे. भाजपाचे पोलिंग बूथवर वर्चस्व आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उगाच वल्गना करीत बसण्यापेक्षा प्रामाणिकपणे काम करावे. केवळ दांड्याला झेंडा लावला की पक्ष वाढत नसतो. त्यासाठी माणसे जोडावी लागतात. पक्ष बलाढ्य होण्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी किमान दहा वर्षे मेहनत घेण्याची गरज आहे. डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवून काम करावे लागेल.
ते पुढे म्हणाले की,भविष्यकाळात जिथे रिझल्ट असेल तेथेच मी सभेला येणार. उगाच मला दाखविण्यासाठी गर्दी जमवू नका. तुमचा आत्मविश्वास मेलेला आहे तो पुन्हा जागृत करा. पक्ष कोणी सोडून गेला तर त्याची काळजी करण्यापेक्षा पक्षवाढीसाठी आपल्याला काय करता येईल, यादृष्टीने प्रयत्न होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पूर्ण वेळ काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. पूर्ण वेळ काम करणार्यांना कोणतेही मानधन मिळणार नाही. पक्ष माझी आई आहे, असे समजून त्यांनी झोकून द्यावे. कोणतेही शासकीय पद न घेता काम करणाराच पक्षाचा खरा कार्यकर्ता आहे, हे कायम लक्षात ठेवा असेही जानकर यांनी सांगितले. आपल्या पक्षाला गुजरात, मध्यप्रदेश मध्ये यश मिळालेले आहे. मग सांगलीत पक्ष कमजोर का, असा सवाल उपस्थित केला. यावेळी विविध पदाधिकार्यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला.
संघाच्या शिबिरानंतर त्याग म्हणजे काय कळाले असे सांगत जानकर म्हणाले, आज भाजपा आपल्याला सगळीकडे वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खूप मोठी ताकद आहे. त्यांचे 21 दिवसांचे शिबीर मी केले आहे. त्यावेळी माझ्या लक्षात आले की संघटना चांगली आहेच परंतु महत्त्वाचे म्हणजे तेथे कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांना कोणत्याच पदाची, लाभाची अपेक्षा नाही. हा खूप मोठा त्याग आहे. या पध्दतीचे कार्यकर्ते आपल्याकडे निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
 जमिनी विकून पक्ष कार्यालय थाटा कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या जमिनी विकून राष्ट्रीय समाज पक्षाच्या नावाने कार्यालये स्थापित करावे, असा अजब सल्ला रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे. आपला पक्ष शून्य आहे. कार्यकर्त्यांनी नाटकं बंद करावीत, दोन दिवसात श्रीमंत व्हायची, आमच्या पक्षात कुठलीही योजना नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या जमिनी विकून पक्ष वाढवावा.’ अशा कानपिचक्या महादेव जानकरांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहे.

No comments:

Post a Comment