Thursday, January 3, 2019

विद्यार्थ्यांनी साधला पाठ्यपुस्तकातील लेखकांशी संवाद

सांगली,(प्रतिनिधी)-
कर्नाळ हायस्कूल येथे गुरुवारी पाचवे विद्यार्थी साहित्य संमेलन रंगले. यावेळी अनेक बालसारस्वतांनी आपल्या विविध साहित्य रचनांचे प्रकार सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय आपल्या पाठ्यपुस्तकातील लेखकांशी भेटून त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला.

या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, सूत्रसंचालन इत्यादी पदांवर ‘सबकुछ विद्यार्थी'च होते.
कर्नाळ येथे व्यावसायिक विकास संस्था व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयेजित या संमेलनात पाठ्यपुस्तकातील लेखक प्रत्यक्ष पाहताना त्यांना फार आनंद झाला होता. माझ्या आजानं पंज्यानं... या कवितेचे कवी शंकर कसबे, आठवीतील राधिका  मेनन या पाठाचे लेखक मच्छिंद्र ऐनापुरे, दुसरीच्या पाठातील कवी फारूक काझी आणि इंग्रजी माध्यमातील पाठ्यपुस्तकातील कवयित्री नीलम माणगावे यांना विद्यार्थ्यांनी आपल्या मनात उमटलेले प्रश्न विचारून आपल्या त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला. लेखकांनी मुलांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिली.
विद्यार्थी संमेलनाची सुरुवात सकाळी गंथदिंडीने प्रारंभ झाला. ही दिंडी प्राथमिक शाळा ते ग. दि. माडगूळकर साहित्यनगरीपर्यंत वाजत गाजत काढण्यात आली. यानंतर संमेलनाध्यक्ष तानंग हायस्कूलची विद्याथिनी तेजश्री पाटील हिच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी स्वागताध्यक्ष मयूर पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे, नामदेव माळी, डायटचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, भिमराव धुळूबुळू, दयासागर बन्ने आदी उपस्थित होते.
 मार्गदर्शन करताना जोंधळे म्हणाले, या जिल्हय़ात अनेक थोर साहित्यिक होऊन गेले आहेत. ते साहित्य आजच्या पिढीसमोर आले पाहिजे. त्यातून सृजन घडू शकतो. आजकाल जातीजातीत भांडणे लावण्याचे षडयंत्र केले जात आहे. यापासून नव्या पिढीला दूर ठेवून, त्यांना मानवतेचे समतावादी संस्कार करणे गरजेचे आहे. ते काम फक्त साहित्यच करु शकते. मुलांना मोबाईल देण्यापेक्षा पुस्तके घेऊन द्या.शिक्षकांनी सातव्या वेतनाच्या माध्यमातून आपल्या घरातील कपाट पुस्तकांनी समृद्ध करावे,असे आवाहन केले.
 संमेलनाध्यक्ष तेजश्री पाटील म्हणाली, प्रत्येकाने आपली क्षमता ओळखणे गरजेचे आहे. त्यांना वाव दिला पाहिजे. आपल्या मनातील भावना कागदावर उतरवा, तरच त्यातून नवलेखक तयार होतील.
 यानंतर उर्वी पाटील हिच्या अध्यक्षतेखाली अनुभवकथन कार्यक्रम पार पडला. यावेळी डिअर मोली या चित्रपटात काम केलेल्या उर्वी पाटील हिने हिमालयातील सरपात शिखर सर केल्याचे  व चित्रपटातील अनुभवाचे कथन केले. तसेच हर्षद सटाले, रुपाली पाटील, सुरज इंगळे, रिया कदम, प्रतिक पाटील आदींनीही या अनुभव कथन कार्यक्रमात सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment