Thursday, January 3, 2019

ओंकारस्वरुपा फौंडेशनला पुरस्कार जाहीर


जत,(प्रतिनिधी)-
 केंद्र शासनांतर्गत येणार्या नेहरू युवा केंद्राच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार जत तालुक्यातील येळवी येथील ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेला जाहीर झाला आहे. नेहरू युवा केंद्राचे समन्वयक प्रमोद हिंगे, लेखापाल संजय कुरणे यांनी ही माहिती दिली. येळवी येथे ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्था व नेहरू युवा केंद्राच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे संजय कुरणे यांनी ही घोषणा केली.
पुरस्कारासाठी जिल्ह्यातील नामांकित संस्थांनी प्रस्ताव दाखल केले होते. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सर्व निकष तपासून येळवी येथील ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेला हा मानाचा जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार जाहीर करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक पंचाक्षरी अंकलगी, अनिल अंकलगी, प्रकाश गुदळे, येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष दीपक अंकलगी, सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांच्या टीमने मागील वर्षभरात नेहरू युवा केंद्र, भारती हॉस्पिटल, लायन्स क्लब, येळवी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम राबविले आहेत. दोन आरोग्य शिबिरे घेण्यात आली त्यात हजारांहून अधिक रुग्णांची तज्ज्ञांकडून तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.
रक्तदान शिबिरात पन्नासहून अधिक तरुणांनी रक्तदान केले. या रक्तदानामुळे एका दोन वर्षांच्या मुलीला तातडीने रक्तदान करून तिचा जीव वाचवला. येळवी महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विशेष कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा शिबीर, युवा संसद कार्यशाळेंतर्गत स्वछता व योग शिबीर, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यासह आजी, माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा आगळावेगळा कार्यक्रम घेत त्यांना संस्थेने सन्मानित केले. या कार्यक्रमाची दखल सैनिक कल्याण कार्यालयाने घेत संस्थेला प्रशस्तिपत्र दिले. जलयुक्त शिवार व पाणी फौंडेशन, मतदान नोंदणी, रेशनकार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड शिबिराचे आयोजनही केले होते. या सर्व कामाची दखल घेत संस्थेला मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेला केंद्र शासनाचा जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार जाहीर केला आहे.

No comments:

Post a Comment