Sunday, January 6, 2019

आता तिसावं वरीस धोक्याचं..


बदलती जीवनशैली : तरुण वयातच जडताहेत आजार
जत,( प्रतिनिधी)-
टार्गेट्स, डेडलाइन, स्पर्धा, पैसे, नातेसंबंध, मोठी स्वप्ने, जडलेली व्यसने या सगळ्यांत तरुण पिढी गुरफटून गेली आहे. चांगल्या भविष्यासाठी सतत झटणारी ही पिढी स्वत:चे आरोग्य धोक्यात टाकते आहे. त्यामुळे वीसएक वर्षांपूर्वी पन्नाशी- साठीनंतर जडणारे आजार हे आता अवघ्या तिशीत तरुणांना गाठत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तरुणांनी स्वत:साठी वेळ देताना व्यायामावर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वय वाढल्याने मानवी शरीरात बदल होत जातात. शरीराची कार्यक्षमता कमी होत गेल्यामुळे विविध व्याधी उतारवयात जडतात. तारुण्यात शारीरिक क्षमता उत्तम असते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयातच आजार जडत आहेत.
गेल्या 10 वर्षांत हृदयविकारतज्ज्ञ, मधुमेहतज्ज्ञांकडे तिशीतील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तरुणांना जडलेली व्यसने ही अत्यंत घातक आहे. 30-35 वयोगटात जडणार्या हृदयविकाराला धूम्रपान हे महत्त्वाचे कारण आहे. महाविद्यालयात गेल्यावर अनेक तरुण-तरुणी व्यसनांच्या आहारी जातात. त्यात धूम्रपानाच्या व्यसनाचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर मद्यपान केले जाते. आयुष्यातील ताण वाढलेला आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे स्थूलतेचे प्रमाण वाढते. स्थूलपणामुळेही अनेक आजार जडतात. स्थूलपणा वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे अनेकांचे काम बैठे असते. संगणकासमोर तासनतास बसून राहतात. शारीरिक हालचाल नसते. स्थूलता वाढल्याने हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाचा आजार जडतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
तरुणांना होणारे आजार हे जीवनशैलीमुळे जडत आहेत. याविषयाची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. पाश्चिमात्य देशांपेक्षा आपल्या देशात आजार जडण्याची वयोर्मयादा 10 वर्षांनी कमी आहे. त्यातच आयुष्यात वाढलेल्या तणावामुळे आजार जडण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. गेल्या दहा वर्षात हा प्रश्न गंभीर झाला आहे. केंद्रीय सरकारने असंसर्गजन्य आजारांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब या आजारांविषयी एक धोरण आखले पाहिजे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment