Friday, January 4, 2019

संखमध्ये श्रीगुरुबसव विरक्त मठाकडून विविध धार्मिक कार्यक्रम


जत,(प्रतिनिधी)-
संख (ता. जत) येथील श्री गुरुबसव विरक्त मठाकडून गुरुबसव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने प्रवचन कार्यक्रम, ग्रामदैवत लायव्वादेवीचा पालखी मिरवणूक सोहळा आणि 1001 सुहासिनींची ओटी भरणे असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि आनंदी वातावरणात झाला.

 मृगेंद्र महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवृत्त प्राचार्य रामू फुटाणी, तमन्ना बागेळी, शिवाणणा हुबनूर, मुरग्याप्पा घाळी, बाबूराव रजपूत, बसण्णा येळदरी यांच्या पुढाकाराने संख गावात गेल्या सहा दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीगुरुबसव विरक्त मठाच्या समोर लाखो रुपये खर्चून भव्य असा सभामंडप बांधण्यात आला आहे. या सभामंडपाचे उद्घाटन आणि वास्तुशांती करण्यात आले. नवीन तयार करण्यात आलेल्या श्रीगुरुबसव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात झाली. होम हवन, वेदमंत्रोपचारात अभिषेक, आणि विधिवत पूजा घालून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
अतिशय मंगलमय आणि श्रद्धापूर्ण वातावरणात झालेल्या मूर्तींच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संख गावाला नवचैतन्य प्राप्त झाले होते. यावेळी 1001 सुहासिनींनी एकाच रंगाची साडी परिधान करून श्रीगुरुबसव मूर्तीची ओवाळणी व आरती करून आशीर्वाद घेतले. सुहासिनींची ओटी भरणेचा कार्यक्रमही यावेळी पार पडला. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. भाऊसाहेब पवार यांनी स्वतःच्या खर्चाने सर्व सहभागी 1001 महिलांना एकाच रंगाच्या साडीचे वाटप केले. एकाच रंगाची साडी परिधान केल्याने एक वेगळेच नवचैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. या दानशूरपणाबद्दल डॉ. पवार यांचे कौतुक करण्यात आले. यानिमित्ताने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
गेल्या आठवड्यापासून गदग येथील पट्टूरेश्वर महास्वामीजी यांच्या प्रवचनाचे कार्यक्रम पार पडले. मोफत मार्गदर्शन आणि उपचार मिळावे म्हणून नेत्रतपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विजयपूर येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ प्रभुगौडा पाटील यांनी नेत्ररुग्णांवर उपचार केले. यात 250 हून अधिक रुग्णांनी सहभागी होत याचा लाभ घेतला. गेल्या सहा दिवसापासून चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने बसवराज बिरादार (येगापगोळ) यांनी अन्नदानाचे वाटप केले. कार्यक्रमास आमदार विलासराव जगताप यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली. बसवन बागेवाडीचे सिध्दलिंग स्वामीजी, सांभाळ (बीड) चे परमपूज्य विजयकुमार स्वामीजी यांची खास उपस्थिती लाभली.


No comments:

Post a Comment