Saturday, January 19, 2019

जत-देवनाळ रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट

(जत-देवनाळ रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना पाठीमागे अशी खडी उचकटली जात आहे.)
जत,(प्रतिनिधी)-
जत ते देवनाळ रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. डांबराचा अजिबात वापर करण्यात न आल्याने अंथरलेली खडी पुन्हा उखडू लागली आहे. या कामाची चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

जत शहरातील देवदासी वसाहतपासून देवनाळला जाणाऱ्या मार्गाचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून त्यापेक्षा अगोदरचा रस्ता बरा होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अगोदरच्या डांबरी रस्त्यावर फक्त खडी अंथरली जात आहे. ही खडी टाकण्यापूर्वी डांबर ओतण्यात आले नाही. त्यामुळे खडी रस्त्याला चिकटलीच नाही. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने ही खडी पुन्हा उखडून रस्त्यावर पसरली आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे मुश्किल झाले आहे. खडी आणि डांबराचा अत्यंत कमी वापर करण्यात आल्याने, आहे त्या रस्त्याची दुर्दशा होऊ लागली आहे. खडी उखडली असताना जुजबी भराव करून रस्त्याचे काम तसेच पुढे रेटले जात आहे. संबंधित विभागाने या रस्त्याच्या कामाची पाहणी करून रस्त्याचे काम चोख करून घ्यावे व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

1 comment:

  1. असे प्रत्येक ठिकाणी होत आहे.डांबर थुंकल्यासारखे शिंपडतात आणि साईड पट्टी तर अर्धा अर्धा फूट खाली आहे.

    ReplyDelete