Tuesday, January 15, 2019

पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱयांची चौकशी करून कारवाई:गटविकास अधिकारी सौ. वाघमळे

जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कोणत्याही कामाची जबाबदारी घेत नाहीत. पाणी टंचाईचे गांभीर्य त्यांना सांगूनही  समजत नाही. आपल्या अखत्यारीत येत असलेल्या साहित्याची माहिती ते देत नाहीत. सर्वत्र सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे या विभागाची  चौकशी सुरू करण्यात आली आहे.  चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे . अशी खंत  पंचायत समिती गट विकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी मासिक बैठकीत बोलताना व्यक्त केली.

     सदर चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ  निलंबित करून चौकशी करावी असा ठराव पंचायत समिती मासिक  बैठकीत  एकमताने संमत करण्यात आला . बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती सुशीला तावंशी होत्या.
    ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे नियमित कर्मचारी कार्यरत असताना ते काम करत नाहीत. मानधनावर घेतलेले कर्मचारी काम करत आहेत. नियमाप्रमाणे मानधनावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार प्रशासनाला काढता येत नाही .  कामचुकार अधिकारी व कर्मचारी  स्वतःच्या सोयीसाठी मानधनावर कर्मचारी घेण्याची सक्ती करत आहेत.आणि  आपली जबाबदारी झटकत आहेत .असा आरोप सदस्यांनी सभागृहात केला असता गटविकास अधिकारी म्हणाल्या या कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना लेखी आदेश देऊन कामाला लावण्यात आले आहे. सध्यातरी सुरळीतपणे काम सुरू आहे. गोडावून मधील साहीत्याची   संपूर्ण तपासणी झाल्यानंतर कामाची जबाबदारी  निश्चित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
  बोअर दुरुस्तीचे साहित्य नाही असे कारण पुढे करून पाणी असलेले बोअर दुरुस्त केले जात नाही .त्यामुळे काही गावातील नागरिकांना तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे .  पाणी पुरवठा विभागातील अधिकारी वर्गणीची सक्ती करत आहेत.त्यामुळे बोअर दुरुस्त होत नाहीत. यापुढे कोणत्याही वर्गणीची सक्ती करू नये .नादुरुस्त बोअर दुरुस्त करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी सूचना गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी संबंधितांना केली
   अंकलगी ( ता.जत ) साठवण तलावातील पाणी पिण्यासाठी योग्य नाही.सध्या या तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे . पूर्व भागातील एकमेव पाणीपुरवठा केंद्र म्हणून त्याकडे बघितले जात आहे .  तलावाखाली असलेल्या  विहीरीतू पाणी भरून घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे . परंतु पाणीपुरवठा करण्यात येणारे गाव व तलाव यातील अंतर  ३५  ते  ४० किलोमीटर इतके होत आहे . यामुळे  वेळ व पैसा याचा अपव्यय होत आहे . कर्नाटकातील घुटनाळ  जि. विजापूर येथील साठवण तलावातून टँकर भरण्यासाठी परवानगी मिळावी असा प्रस्ताव महसूल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे . हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अंतर कमी होणार आहे . त्यामुळे सीमा भागातील गावांना  तात्काळ पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. शासनाने हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी सदस्यांनी सभागृहात केली असता विजापूर व  सांगली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेणे अपेक्षित आहे .असे सांगण्यात आले.
     म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेतून जत तालुक्याला पहिल्या आवर्तनात कमी प्रमाणात पाणी आले आहे व जादा पैसे भरून घेण्यात आले आहेत. मिरज ,कवठेमंकाळ ,सांगोला व मंगळवेढा या तालुक्यात पाणी जादा सोडण्यात आले आहे आणि पैसे कमी भरून घेतले आहेत. जत  तालुक्याला प्रशासनाकडून सतत सापत्न वागणूक मिळत आहे .वरील तालुक्यातून पैसे किती भरून घेतले व पाणी किती सोडले याची माहिती प्रशासनाने पुढील मासीक  बैठकीत द्यावी अशी मागणी सदस्यांनी सभागृहात केली असता , सविस्तर माहिती देण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
      आरोग्य ,प्राथमिक शिक्षण ,अंगणवाडी दळणवळण ,रस्ते ,बांधकाम , घरकुल योजना , वीज वितरण कंपनी ,एसटी बस वाहतूक, आदी विषयावर सभागृहात चर्चा झाली .या चर्चेत शिवाजी शिंदे , अप्पा मासाळ ,रवींद्र सावंत ,विष्णू चव्हाण , श्रीदेवी जावीर ,मंगल जमदाडे ,अश्विनी चव्हाण ,अर्चना पाटील , मनोज जगताप , रामान्ना जीवन्नवार यानी भाग घेतला. उपसभापती अँड. आडव्याप्पा घेरडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment