Sunday, January 6, 2019

चाराटंचाईने शेतकरी त्रस्त


बिळूर:
जत तालुक्यात सध्या चाराटंचाईमुळे शेतकर्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. शेतीला जोडधंदा आणि पूरक व्यवसाय म्हणून परिसरातील शेतकर्यांकडे मोठ्या संख्येने जनावरे असून ज्वारीचा कडबा, तुरीचे भुसकट हे परिसरातील जनावरांच्या चार्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. जनावरे खरिपातील मका आणि रब्बीतील ज्वारी, तूर, हरबरा या पिकाच्या चार्यावर अवलंबून असतात. मात्र यंदा पावसाने दगा दिल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे.
     या वर्षी मक्याचे क्षेत्र बर्यापैकी होते. मात्र शेतकर्यांच्या आशेवर पाणी पडले. अत्यल्प पावसाने जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने आणि भूजल पातळी खोल गेल्याने रब्बी हंगामाकडे शेतकर्यांना पाठ फिरवावी लागली. त्यामुळे चार्याचे सर्वच स्रोत संपल्याने भीषण चाराटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. दुधाच्या जनावरांसाठी चार्याची उणीव असतानाच भाकड जनावरे कशी जगवायची ही मोठी समस्या आहे. पुढील आठ-नऊ महिने जनावरे कशी जगवायची असा गंभीर प्रश्न पशुपालकासमोर उभा आहे. चारा टंचाईने त्रस्त शेतकर्यांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील पशुपालक करीत आहेत. तर काही सामाजिक संघटनांनी शासनाने तालुक्यात चारा छावण्या उभ्या कराव्यात अशी मागणी केली आहे.No comments:

Post a Comment