Monday, January 7, 2019

कर्जाला कंटाळून मुचंडीत शेतकर्‍याची आत्महत्या


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील मुचंडी येथील दिलीप अर्जून तेली (वय 25) या सुशिक्षित तरुणाने सोमवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा असून त्याच्या अंगावर सुमारे पंधरा लाखाचे कर्ज होते, असे सांगण्यात आले. दरम्यान, शेतकरी आत्महत्येची ही जत तालुक्यातील चौथी घटना असून यामुळे जत तालुक्यातील खळबळ उडाली आहे.

विजापूर-गुहागर या राज्यमार्गालगत मुचंडीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर दिलीप तेलीचे सुमारे 21 एकर शेत आहे. यातील चार एकर जमीन बागायत आहे. बाकीची उर्वरीत जमीन जिरायत आहे. याचठिकाणी दिलीपचे संपूर्ण कुटुंब एकत्रित राहत आहे. त्याचे भाऊ अशिक्षित असल्याकारणाने घरचे सर्व आर्थिक व्यवहार तोच पाहात होता. 2009-10 च्या दरम्यान दिलीप याच्या वडिलांनी गावातील सर्वोदय विकास सोसायटीतून सुमारे 14 लाख 69 हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. या कर्जातून त्यांनी द्राक्षबाग केली होती. दोन वर्षांनी दिलीपच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले. त्यामुळे या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी दिलीपवर येऊन पडली. कमी पाऊसमान असताना त्याने कशी तरी शेती करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कर्ज काही फेडता आले नाही.
अलिकड्च्या काही दिवसांपासून दिलीप उदास होता. तणावाखाली होता. सोमवारी सकाळी घरातील सर्वजण द्राक्षबागेत काम करत होता. घरातील लोकही त्याच्यासोबत होते. दिलीपने जरा घरी जाऊन येतो, असे सांगून तो घरी आला. घरात कोणी नसल्याचे पाहून सकाळी सुमारे दहाच्या दरम्यान त्याने घराच्या घताच्या तुळीला दोरीने गळ्फास लावून आत्महत्या केली. त्याची आई दिलीप परत का आला नाही, हे पाहण्यासाठी घरी आली तेव्हा त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची फिर्याद पोलिस पाटील रोहिदास शिवशरण यांनी जत पोलिसांत दिली. अधिक तपास हवालदार बजरंग थोरात करत आहेत. No comments:

Post a Comment