Thursday, January 3, 2019

पदवी विषयानुसारच ‘पवित्र’ शिक्षक भरती

जत,(प्रतिनिधी)-
  राज्यातील सहावी ते आठवीच्या वगार्र्ंवर शिक्षकांची नियुक्ती करताना उमेदवार कोणताही विषय घेऊन शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाला असला, तरी त्यांच्या पदवीचेेच विषय ग्राह्य धरण्यात येणार आहेत. पदवीकरिता जे विषय असतील त्याच विषयांकरिता नियुक्ती दिली जावी, असे आदेश शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिले आहेत.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, अनुदानास पात्र असलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्त पदे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्राथमिक शिक्षक पदाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. मात्र, 6 वी ते 8 वी या वर्गांवर नियुक्त करावयाच्या शिक्षकांनी पेपर-2 या गटाची परीक्षा कोणता विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे, याबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना दिल्या नव्हत्या; तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता अशी कोणतीही अट निर्धारित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अनेक उमेदवार त्यांच्या पदवीच्या विषयाऐवजी अन्य शाखांचे विषय घेऊन पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले असल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले आहे.
त्या अनुषंगाने शासनाने यासंदर्भात नवा निर्णय जाहीर केला आहे. निर्णयानुसार शिक्षकांचे पदवीला जे विषय असतील, त्याच विषयांचे शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे.  राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे केल्या जाणार्‍या शिक्षक भरतीकरिता नवा निर्णय लागू करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment