Thursday, January 3, 2019

जेईई मेन्स परीक्षा येत्या रविवारपासून

जत,(प्रतिनिधी)-
आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेशांसाठी घेतली जाणारी जेईई मेन्स परीक्षा 6 ते 20 जानेवारीदरम्यान राज्यातील 258 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात द्यावी लागणार आहे.

‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे. जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम) ही दरवर्षी एकदा घेण्यात येते. यंदापासून शैक्षणिक सत्र सुरू होण्याअगोदर दोन वेळा या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.  देशभरात सुमारे साडेनऊ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. आयआयटी, एनआयटी, ट्रिपल-आयटी आणि इतर केंद्रीय अनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश जेईईच्या माध्यमातून केले जातात. या आधी ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत होती. मात्र, सर्व प्रकारच्या परीक्षा घेण्यासाठी देशस्तरावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना करण्यात आली. 2019 पासून या संस्थेच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात येत आहेत. जेईईचे आयोजनही याच एनटीएद्वारे केले जाणार आहे. बी.ई. आणि बी.टेक. या दोन पदव्यांसाठीचे प्रवेश जेईईमार्फत केले जाणार आहेत. संगणक आधारित ही परीक्षा घेण्यासाठी शहरात दोन ते तीन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांची नावे, विद्यार्थ्याचे आसन क्रमांक, परीक्षेची वेळ ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेळांमध्ये विभागण्यात आले आहे. सकाळी 9.30 ते 12.30 आणि दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे.
पुढील परीक्षा एप्रिलमध्ये 
यंदाच्या वर्षातील दुसरी जेईई मेन्स परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. 6 ते 20 एप्रिलदरम्यान ही परीक्षा घेण्यात येणार आहे. दोनपैकी एक परीक्षा किंवा दोन्ही परीक्षांना बसण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. एखादा विद्यार्थी दोन्ही परीक्षांना बसल्यास ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण असतील तेच गुण जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
बारावीचे गुणही धरणार ग्राह्य 
आयआयटी आणि इतर प्रतिष्ठित संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई मेन्समधील गुणांसह बारावीच्या परीक्षेतील गुणही ग्राह्य धरले जातील. विविध मंडळांनी घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण किंवा सर्वाधिक 20 पर्सेंटाइल मिळविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या परीक्षेत 65 टक्के गुण मिळवणे बंधनकारक राहणार आहे.

No comments:

Post a Comment