Friday, January 4, 2019

दुसर्‍या जिल्हा, राज्यामध्ये चारा वाहतूक व विक्रीस प्रतिबंध


जत,(प्रतिनिधी)-
 दि महाराष्ट्र पशुखाद्य (वाहतूक नियंत्रण) आदेश 1985, अन्न व नागरी पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई 32 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वि. ना. काळम यांनी 30 जून 2019 पर्यंत सांगली जिल्ह्यातील चारा दुसर्या जिल्ह्यामध्ये व लगतच्या राज्यामध्ये वाहतूक व विक्री करण्यास प्रतिबंध केला आहे.

 दिनांक 31 डिसेंबर 2018 पासून हा आदेश लागू करण्यात आला असून, या आदेशानुसार केंद्र सरकार अथवा राज्य सरकार यांचे नियंत्रण असणारी संस्था; तसेच इतर जिल्ह्यामधून अथवा इतर राज्यामधून सांगली जिल्ह्यात येणारा चारा वाहतूक करण्यास सूट देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी व तासगाव या 5 तालुक्यांमध्ये शासन निर्णय दि. 31 ऑक्टोबर 2018 अन्वये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित केला आहे. तसेच मिरज तालुक्यातील आरग महसूल मंडळ, वाळवा इस्लामपूर तालुक्यातील वाळवा, पेठ, कासेगाव, आष्टा, इस्लामपूर, कामेरी महसूल मंडळ, पलूस तालुक्यातील भिलवडी व पलूस महसूल मंडळ, कडेगाव तालुक्यातील नेवरी महसूल मंडळामध्ये शासन निर्णय दि. 6 नोव्हेंबर 2018 अन्वये दुष्काळ घोषित केला आहे.
 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील उपलब्ध चारा फेब्रुवारी 2019 अखेरपर्यंत पुरेल, असा अहवाल प्राप्त झाला आहे. उपलब्ध चारा दुसर्या जिल्ह्यामध्ये अथवा लगतच्या राज्यामध्ये वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर टंचाईग्रस्त तालुक्यामध्ये चारा टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा आदेश जारी केला आहे.

No comments:

Post a Comment