Thursday, January 3, 2019

राजे रामराव महाविद्यालयात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

जत,(प्रतिनिधी)-
 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या  जन्मशताब्दी वर्षानिमित्त व राजे रामराव महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या मैदानावर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन ८ व ९ जानेवारी  रोजी  केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.ढेकळे, क्रीडा संचालक प्रा.श्रीमंत ठोंबरे व प्रा.सिद्राम चव्हाण यांनी दिली.

      राजे रामराव महाविद्यालयाला गौरवशाली अशी क्रीडा परंपरा आहे. महाविद्यालयाचे अनेक खेळाडू महाराष्ट्रातील २८ जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून काम करीत आहेत. तसेच राज्याचे क्रीडा संचालकही या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संस्थेच्या कार्यक्षेत्रामधून १३ जिल्ह्यातुन ६८ ज्युनीअर कॉलेज व २६ सिनिअर महाविद्यालयाचे मुला - मुलींचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.क्रीडा स्पर्धा चार गटात संपन्न  होणार असून यामध्ये १०० मी, २०० मी, ४०० मी , ८०० मी, १५०० मी व १५००० मी धावणेच्या स्पर्धेबरोबरच रिले, गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी अशा भरगच्च क्रीडास्पर्धा होणार आहेत.
या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष विक्रम सावंत,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व जत संस्थेचे श्रीमंत इंद्रजितराजे डफळे, श्रीमंत शार्दुलराजे डफळे व सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यापूर्वीही राजे रामराव महाविद्यालयाने विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उत्तमरीत्या आयोजन केले आहे.

No comments:

Post a Comment