Tuesday, January 15, 2019

काँग्रेसचे सांगलीत कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर


सांगली,(प्रतिनिधी)-
 लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकले असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून तालुकानिहाय जनसंपर्क दौरा सुरू करण्यात येणार आहे. बूथ कमिट्या भक्कम करण्यावर भर दिला जाणार असून सांगलीत लवकरच कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर होणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क अभियान सुरू करणे व बूथ कमिट्या मजबूत करण्यासंदर्भात आमदार मोहनराव कदम व पृथ्वीराज पाटील यांच्या अध्यक्षेतखाली तालुकाध्यक्षांसह मनपा क्षेत्रातील पदाधिकार्यांची बैठक पार पडली. पृथ्वीराज पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिटी अध्यक्ष व एका बीएलओची नेमणूक करण्याबरोबर पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकार्यांची 31 जानेवारीपर्यंत नेमणूक करून अहवाल पाठविण्याचे आदेश अखिल भारतीय काँग्रेसने दिले आहेत. त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे. ज्या कार्यकर्त्याला पक्षसंघटनेसाठी काम करायची इच्छा आहे, त्या कार्यकर्त्याने तालुकाध्यक्षांकडे नावे द्यावीत. सामान्य कार्यकर्त्याला देखील आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करता येणार आहे. त्यासाठी पक्षाने अॅप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा राहुल गांधी यांच्याशी थेट संवाद होणार आहे.
 लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मतदारसंघनिहाय जनसंपर्क दौरा सुरू करण्यात येणार आहे. निवडणुकीपूर्वी प्रत्येक तालुक्यात भाजपच्या कारभाराचा भांडाफोड करण्यात येणार आहे. निवडणुकीत प्रचार करण्यापेक्षा त्यापूर्वी प्रचार करण्यावर पदाधिकार्यांनी भर दिला आहे. त्यानुसार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. सध्या काँग्रेसला चांगले वातावरण आहे. भाजप विरोधात सर्व घटकांमध्ये नाराजी आहे. याचा फायदा काँग्रेस घेणार आहे. जिल्ह्यातील नेते मंडळींची लवकरच बैठक घेऊन या अभियानाला सुरूवात होणार आहे. या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.
सांगलीत लवकरच कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार आहे. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी निश्चित झाली आहे. आघाडीच्या नेत्यांच्या एकत्रित दौर्याला आता सुरूवात होणार आहे. त्याची सुरूवात पश्चिम महाराष्ट्रातून होईल, अशी माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली. यावेळी पक्षाचे निरीक्षक प्रकाश सातपुते, संजय पाटील, विक्रम सावंत, अण्णासाहेब कोरे, महादेव पाटील आदी उपस्थित होते. मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील यांची माहिती इच्छुकांची नावे रविवारपर्यंतप्रदेशकडे सांगली लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी रविवार, दि. 20 पर्यंत प्रदेश काँग्रेसकडे पाठवावे, असे आदेश प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसार लवकरच जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक घेऊन इच्छुकांची नावे घेतली जातील. सध्या माजी केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची नावे अधिक चर्चेत आहेत.

No comments:

Post a Comment