Thursday, February 21, 2019

झोप पूर्ण होत नाही? मग हे वाचा

आपल्या शरीराने आणि हृदयाने अपेक्षेप्रमाणे काम करावं असं वाटत असेल, तर त्याला चांगली झोप हवीच. सर्वसाधारणपणे रात्रीची ६ ते ८ तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कामाच्या व्यग्र वेळा, अतिरिक्त ताण, स्पर्धा आणि बदललेल्या जीवनपद्धतीमध्ये रात्रीच्या वेळी ६ ते ८ तास झोप घेणे शक्य होत नाही. परंतु त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. आपलं झोपेचं चक्र टप्प्यांमध्ये विभागलेलं असतं.
हलक्या झोपेपासून गाढ झोपेपयर्ंत आणि नंतर पुन्हा हलक्या झोपेकडे. आपलं शरीर गाढ झोपेच्या टप्प्यात शिरण्यासाठी स्वत:ला सज्ज करतं, तेव्हा हृदयाची गती आणि रक्तदाब कमी होतो. याच काळात आपलं शरीर इंद्रियांना आवश्यक असलेली विश्रांती देऊन स्वत:ला पुन्हा ताजंतवानं करतं. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप गरजेची असते. विशेष म्हणजे आपण किती झोपतो यापेक्षा कसे झोपतो हेही तितकेच महत्त्वाचे असते. अनेकांना दीर्घकाळ झोपल्यानंतरही फ्रेश वाटत नाही किंवा सारखी झोप येत राहते. जास्त वेळाची झोप मिळाल्यानंतरही शांत वाटत नाही याचे कारण आपल्या झोपण्याच्या पद्धतीत असते.
१२ तास झोपूनही तुम्हाला खूप थकल्यासारखे आणि ऊर्जा खर्च झाल्यासारखे वाटत असेल तर त्यात तुमचा अजिबात दोष नसतो. झोपेत तुमच्या डोळ्यांची होणारी हालचाल शांत झोप न होण्यासाठी कारणीभूत असते. झोपेत असतानाही दर ९0 ते १२0 मिनिटांनी आपल्या डोळ्यांची हालचाल होते आणि आपल्याला जास्त काळ झोपूनही झोप पूर्ण न झाल्याचा फील येतो. त्यामुळे आपण किती तास झोपलो यापेक्षा ती झोप कशी होती हे लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे असते.
आपली झोप चांगली झाली तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ज्यांना दीर्घकाळासाठी शांत झोप येते त्यांच्यात कोणत्याही प्रकारच्या भितीचे प्रमाण जास्त असते तसेच हे लोक लवकच चिडतात किंवा जास्त थकतात असेही काही अभ्यासांतून समोर आले आहे. या लोकांना जास्त कितीही झोप झाली तरी ती पुरेशी वाटत नाही आणि दिवसभर झोप येत राहते. त्यामुळे कमी वेळासाठी गाढ झोप लागणे हे जास्त वेळ झोपण्यापेक्षा जास्त आवश्यक असते. मात्र दीर्घकाळ झोपणे हे आरोग्यासाठी चांगले नसते. गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे शरीरातील स्नायू शिथिल होतात. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. झोपताना मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जवळ ठेवल्यास झोपेत अडथळा येतो. त्यामुळे ही उपकरणे दूर ठेवल्यास किंवा बंद केल्यास चांगली गाढ झोप लागण्यास मदत होते. त्यामुळे झोपताना मोबाईल, टॅबलेट आपल्या जवळ नसेल याची विशेष काळजी घ्या. कॉफीमध्ये कॅफेन असते, ज्यामुळे झोप येत नाही. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही काळ कॉफी घेणे टाळावे. त्यामुळे चहा, कॉफी घेण्यापेक्षा दूध घेतलेले केव्हाही चांगले.

No comments:

Post a Comment