Friday, February 22, 2019

रिक्‍त पदांमुळे जतचे आरोग्य बिघडले

जत,(प्रतिनिधी)-
जत  तालुक्याच्या आरोग्याचा प्रश्‍नही फार जटील बनलेला आहे. विद्यमान क्षणी तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालयांसह नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे व अन्य उपकेंद्रे असूनही डॉक्टर्सची व कर्मचार्‍यांची कमतरता असल्यामुळे तालुक्याचे आरोग्य बिघडले आहे.

    येथील रुग्णांना अनेकवेळा पुढील उपचारासाठी तालुक्याबाहेर जावे लागते. जत तालुका विस्ताराने मोठा आहे. जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या जतची आहे. येथील जनतेच्या आरोग्यासाठी शासनाचे जत शहरासह माडग्याळ येथे ग्रामीण रुग्णालय तर तालुक्यात वळसंग,बिळूर, कुंभारी,येळवी, उमदी,संख याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. शिवाय काही ठिकाणी उपकेंद्रे देखील आहेत. शासनाने एवढी सुविधा पुरवूनसुध्दा तालुकावासीयांना अनेकवेळा गंभीर उपचारासाठी सांगली, सोलापूर, कोल्हापूर,विजापूर, मुंबई किंवा अन्य ठिकाणी जावे लागते. रुग्णालये व आरोग्य केंद्रे सुरू आहेत पण अनेक ठिकाणी कर्मचारीच नाहीत. त्यामुळे याचा फटका आरोग्य सेवेला बसताना दिसत आहे. यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेकदा उपचारांना मर्यादा येतात. विशेषत:  सर्पदंशासह कुत्रा चावणे व अन्य व्याधींवरील उपचार हे अशा आरोग्य केंद्रात होत नाहीत. काही आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कायमच्या नियुक्त्याच नाहीत. डॉक्टर कार्यरत एका केंद्रात आणि त्याची नियुक्‍ती ही दुसर्‍याच केंद्रावर  अशी स्थिती असते.
जत आणि माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह अन्य कर्मचारी यांचा स्टाफ  फारच कमी आहे. याठिकाणी अपघात,सर्पदंश अशा रुग्णांना रेफर करून पुढे सांगली,मिरजेला पाठवण्याचा प्रघात पडला आहे. अपघाताचे कुठलेच रुग्ण याठिकाणी थांबवून घेऊन उपचार घेत नाहीत. तालुक्याच्या किमान एका तरी रुग्णालयात सीटीस्कॅनची सुविधा असणे गरजेचे आहे. या गैरसोईचा सामना अनेकवेळा करावा लागतोय. शासकीय रुग्णालयात ही सेवा चारशे ते पाचशे रुपयात मिळते मात्र खासगी रुग्णालयात याच सिटीस्कॅनसाठी पाच ते सहा हजार रूपये मोजावे लागतात. यासाठी लोकांना सांगली,मिरज याठिकाणीच जावे लागत आहे. विविध समस्यांनी तालुक्याचा आरोग्य विभाग त्रस्त असून या समस्या वेळीच सुटणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment