Friday, March 22, 2019

जत तालुक्यात 65 गावे,455 वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे  टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. तालुक्यातील ६५  गावे व त्याखालील ४५५ वाड्या वस्त्यावरील सुमारे  एक लाख आठ हजार ८५४ नागरिकांना मानसी वीस लिटर प्रमाणे टँकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ३१ मार्च अखेरपर्यंत टँकरची संख्या शंभर होण्याची शक्यता जत पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

    तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागातील तीस गावांना म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या कॅनलमधून आलेले पाणी मिळत आहे . उर्वरित १२३ पैकी सुमारे ९३ गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे . उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊन जलसाठे संपुष्टात येत आहेत. जत पूर्व भागात अंकलगी  ( ता.जत ) येथील साठवण तलावातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे . परंतु अंकलगी तलावातील पाणीसाठा सध्या संपुष्टात येत आहे. तलावात  अत्यल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे . तालुक्याच्या पूर्व भागात इतर ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे आहे तेच पाणी टँकरद्वारे नागरिकांना दिले जात आहे . या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया आथवा त्याचे शुध्दीकरण केले जात नाही. गढूळ व शेवाळ मिश्रित पाणी तलावात शिल्लक राहिले आहे इतर पर्याय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे आहे तोच पाणीसाठा प्रशासनाने वापरण्यास सुरुवात केली आहे .यामुळे साथीचे आजार , रोगराई पसरुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे अशी भिती व्यक्त केली जात आहे.
      वजरवाड , गुगवाड ,  बसरगी ,  सिंधूर ,  दरिकोनुर , दरीबडची , जाह्याळ खुर्द , सिद्धनाथ , उमदी , सोनलगी , सुसलाद , हळ्ळी या बारा  गावांना प्रत्येकी एका टँकरद्वारे सध्या पाणीपुरवठा करण्यात येत आहे .परंतु गावाची अस्तित्वातही लोकसंख्या व करण्यात येणारा पाणीपुरवठा अत्यल्प प्रमाणात आहे . येथील खेपा वाढवून मिळाव्यात अशी मागणी गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. परंतु प्रशासनाकडून याची अद्याप दखल घेण्यात आली नाही .याबद्दल नागरिकांमधून प्रशासनाच्या दप्तर दिरंगाई बद्दल नापसंती व्यक्त करण्यात येत आहे . पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावाच्या जवळपास पाणी साठा व पाणी उद्धव ठिकाण उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना रानोमाळ तिन - चार किलोमीटर भटकंती करून पाणी आणावे लागत आहे .
    कवठेमंकाळ , तासगाव , खानापूर , आटपाडी या तालुक्यातील टँकरची  संख्या कमी असली तरी येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या जादा आहे तेथे रिक्त पदे नाहीत . जत ग्रामीण पाणीपुरवठा विभागात शाखा अभियंता चार पदे रिक्त आहेत , वरिष्ठ सहाय्यक एक पद व वाहन चालक एक  पद रिक्त आहे . या  रिक्त पदांमुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर  अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे . पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील रिक्त पदे त्वरित भरून घ्यावीत  व टंचाई कालावधीत पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण , रवींद्र सावंत, आप्पा मासाळ यांनी केली आहे.
      पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावातील नागरिकांनी टँकरची मागणी केल्यानंतर  त्या गावाचे सर्वेक्षण व पाहणी करून त्याचा अहवाल  वरिष्ठाकडे मंजुरीसाठी पाठवून द्यावा लागत आहे .परंतु या सर्व कामाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असणारे तज्ञ कर्मचारी व अधिकारी या कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी  विलंब होत आहे . त्यामुळे पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावातील नागरिकांना तिव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे . जत पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी व अधिकाऱ्याना दैनंदिन कार्यालयीन कामकाज व पाणी टंचाई आणि निवडणूक कार्यक्रम  असे तिन ठिकाणी काम करावे लागत आहे.  या विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना निवडणूक कार्यक्रमात घेवू नये किंवा येथील  रिक्त जागा भरून नागरिकांची होणारी गैरसोय कमी करावी अशी मागणी नागरीकातून पुढे येऊ लागली आहे.
      अंकलगी ( ता.जत ) साठवण तलावातील उपलब्ध असलेला पाणीसाठा संपुष्टात आला आहे. जत तालुक्याच्या सिमेवर असलेल्या भुयार ( ता.मंगळवेढा )  येथे पस्तीस गावासाठी  प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची टाकी  आहे .  पंढरपूर ते भुयार असे पन्नास किलोमीटर बंदिस्त पाईपलाइन करून भीमा नदीतून येथे पाणी आणण्यात आले आहे . ही योजना मंगळवेढा तालुका प्रशासनाने तयार केली आहे . जाडरबोबलाद ( ता. जत ) ते भुयार ( ता.मंगळवेढा ) हे  आंतर सुमारे सात किलोमीटर इतके अत्यल्प आहे सिमाभागातील रस्ता सुस्थितीत असून भुयार येथून जत तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना टँकरद्वारे  पाणीपुरवठा करता येणार आहे .यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करून भुयार  येथे टँकर भरून घेवून जत तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येणार आहे . यासाठी  प्रांताधिकारी जत विभाग तुषार ठोंबरे  व तहसीलदार सचिन पाटील  यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जत पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील रिक्त जागा भरून पाणी पुरवठा सुरळित करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. रिक्त जागा भरण्यासाठी वरीष्ठाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. अशी माहिती पंचायत समिती गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यानी दिली.

No comments:

Post a Comment