Monday, March 4, 2019

बसवेश्वरांचे विचार आणि कार्य ऐकण्यापेक्षा प्रत्यक्षात आचरणात आणा -अमृतानंद

जत,(प्रतिनिधी)-
श्री बसवेश्वर मूर्ती स्थापन भूमीपूजन समारंभ सोहळा  संख (ता. जत) येथील बसवेश्वर चौकात श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी लिंगायत पंचमसाली जगदगुरू महापीठ,धर्म क्षेत्र कूडलसंगम  यांच्या हस्ते करण्यात आले. संख येथे  म.नि.प्र.मुरघेंद्र महास्वामीजी संख , बिळूर मठ , म.नि.प्र.शिवबसव महास्वामीजी गच्चिनमठ , अथणी,  प.पू.अमृतानंद महास्वामीजी गुरूदेवाश्रम ,बालगांव - अकळवाडी ,श्री प.पू.अभिनव महाराज रायलिंगेश्वर मठ,ककमरी, म.नि.प्र.सिध्दलींग महास्वामीजी बसवन बागेवाडी अशा वरील सर्व स्वामीजीच्यां उपस्थित पार पडले .

   संख येथे माजी सभापती आर.के.पाटील, गुरबसव आर.पाटील , तमणा बागेळी, डॉ.भाऊसाहेब पवार , आप्पाराया पाटील तसेच गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व ग्रामस्थ यांच्या उपस्थित पार पडले.गुरुबसव पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. महात्मा बसवेश्वर यांच्या तैलचित्राचे उपस्थित स्वामीजींच्या हस्ते पूजन करून आणि बसववचनाच्या गायनाने कार्यक्रमास सुरवात झाली. संख गावात प्रमुख मार्गावरून प्रतिमेचे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील हजारोंच्या संख्येने महिला-पुरुष सहभागी झाले होते.  तर या कार्यक्रम साठी आलेल्या भाविकांना अन्न प्रसादाचे आयोजन डॉ.भाऊसाहेब पवार यांच्याकडून करण्यात आले होते. तसेच संख येथे सर्वात जास्त लिंगायत समाज आहे. बसवेश्वर मूर्ती बसवण्यासाठी भूमीपूजन झाल्याने पुतळा बसवण्याकामी गती येईल आणि संखकरांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने  संख गावात समाधान व्यक्त होत आहे.
    बालगाव आश्रमाचे परमपूज्य अमृतानंद स्वामी म्हणाले की.समाजामध्ये असणारे अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती परंपरा कमी करून परस्परांतील मतभेद दूर करून समाजाला मानवतेची शिकवण देणारे जे महान संत-महात्मे होऊन गेले, त्यामध्ये बसवेश्‍वरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या पुतळ्यामुळे अन्याय अत्याचार अधर्म नाश होऊन लोक त्यांच्या आदर्श विचाराने वाटचाल करतील अशी आशा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की,त्यांचे कार्य व विचार ऐकण्यापेक्षा त्यांचे प्रत्यक्ष आचरण आपल्या दैनंदिन जीवनात करणे महत्त्वाचे आहे. या पुर्णाकृती पुतळ्यामुळे संखच्या वैभवात भर पडणार आहे.
   यावेळी कुडलसंगमचे महास्वामीजी म्हणाले की महात्मा बसवेश्वरांचे कार्य  आणि विचार खूप महान आहेत संपूर्ण जगाला आदर्श वाटावे असे महात्मा बसवेश्वर यांचे जीवनचरित्र आहे. बाराव्या शतकातील एक महान सामाजिक क्रांतिकारक होते. महात्मा बसवेश्वर यांना समाजातील कोणतीच विषमता मान्य नव्हती. परंतु बसवेश्वर यांच्या काळात वर्णभेद, लिंगभेद, जातीभेद यांनी कहर केला होता. या विषमतेमुळे समाजात विस्कळीतपणा येऊन अराजकता निर्माण झाली होती. महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील या अन्यायकारक रुढी, परंपरा, अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. समाजास एकसंघ केले. विषमता नष्ट करणारा 12 व्या शतकातला पहिला महामानव म्हणजे महात्मा बसवेश्वर होय. महात्मा बसवेश्वर यांचे कार्य आणि मांडलेले विचार अव्दितीय आहेत.

No comments:

Post a Comment