Monday, March 18, 2019

मतदार ओळखपत्राबरोबरच अन्य दहा पुरावे ग्राह्य धरणार

जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीत मतदानावेळी निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसल्यास संबंधित मतदाराला अन्य दहा प्रकारच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा सादर केला तर मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदारांना नवीन रंगीत ओळखपत्र देण्यास सुरुवात केली आहे.

मतदारयादीत नाव आहे; परंतु मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारचे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/ केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिकमर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांकाद्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तऐवज यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र वाटप करण्यास सुरुवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार आहे. यापूर्वी संगणकावर मुद्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते; परंतु आता आकर्षक असे, रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्लोराईड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येत आहे. ज्या नागरिकांकडे असे ओळखपत्र नसेल त्यांनी अर्ज केल्यास त्यांना नवीन ओळखपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांमार्फत (बीएलओ) घरपोच देण्यात येत आहे. मतदाराच्या नावात, पत्त्यात, लग्नानंतरच्या नावात बदल आदी कारणांमुळे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करता येणार आहे.
मतदारांना आता रंगीत ओळखपत्र
नवीन रंगीत ओळखपत्रावर मतदाराचे नाव, छायाचित्र, जन्म तारीख, पत्ता, लिंग आणि मतदाराचा विशिष्ट ओळख क्रमांक आदी माहिती छापली आहे. त्याचबरोबर बारकोड असल्यामुळे बनावट ओळखपत्राला आळा बसणार आहे. हे ओळखपत्र पीव्हीसीपासून तयार केले असले तरी ते स्मार्टकार्ड नाही.

No comments:

Post a Comment