Wednesday, April 24, 2019

स्मार्टफोन’मुळे मामाचा गावसुद्धा हरवला

देशी खेळ झाले हद्दपार
जत,(प्रतिनिधी)-
टीव्ही,मोबाईल, कॉम्प्युटर, याशिवाय अन्य बैठे खेळांमुळे लगोरी, गोट्या, आंब्याच्या कोयीचा खेळ,लंगडी, सुरपारंब्या असे देशी खेळ गावागावतून हद्दपार झाले आहेत. यामुळे मामाचा गाव सुद्धा मुलांना आपलासा वाटेनासा झाला आहे.  त्यामुळे नात्यांवर देखील परिणाम होऊ लागला आहे.

लहान  शालेय  मुलांच्या  परीक्षा  संपल्या  की त्या बालकांना वेध लागायचे ते उन्हाळ्याच्या आनंददायी सुट्टीचे, सुटीमधील मामाच्या गावचे, भर उन्हात हुंदडायचे, आंबे, चिंचा यासह रानमेवा चाखायचे. मात्र, या सर्व बाबी सध्या गोष्टी अथवा पुस्तकांपुरत्याच मर्यादित राहिल्या असल्याचेच दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी उन्हाळी सुट्टी म्हटले की, मुलांना आपापल्या मामाच्या गावाची अर्थात आजोळाची आठवण येत असायची. मात्र, अलीकडच्या काही वर्षांपासून पालकांच्या वैचारिक बदलामधून व आपली मुले रोबोट बनविण्यासाठी आजच्या संगणकीय व आधुनिक युगामध्ये मुलांना  मामाच्या गावाला पाठविण्याऐवजी त्यांना उन्हाळी प्रशिक्षणासाठी (समर कॅम्प) पाठविले जात आहे.
आपल्या मुलांनी काहीतरी नवीन शिकावे यासाठी पालक प्रयत्न करताना दिसत आहेत. उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे, विविध कलांचे प्रशिक्षण, महाबळेश्‍वर, सातारा आदी ठिकाणी पर्यटन आदींना पालकांनी पसंती दिली असल्याचे अलीकडे सर्रास निदर्शनास येत आहे. मात्र, पूर्वी  लहान मुलांनी घेतलेला उन्हाळ्यातील सर्वोत्तम आनंद आजच्या काळातील मुलांना दुरापास्त झाला आहे. त्यामुळे सुट्टीतील मामाच्या गावापासून अलीकडची तरूण पिढी कोसो दूर गेली आहे. लहान मुले मामाचे गावच हरवून बसलेली आहेत. त्यामुळे आधुनिक युगात  लाडक्या मामाच्या गावातील सट्टीतील धमाल, दंगामस्तीसह विविध देशी खेळांना ही तरूण व भावी पिढी पोरकी झाली आहे.
काही वर्षांपूर्वी लहान मुलांना शाळेस सुट्टी लागली की करमणुकीचे एकमेव साधन असलेल्या आकाशवाणीवरील खूप लोकप्रिय  असणारे बालगोपाळांच्या आवडीचे  ‘झुक..झुक..झुक..आगीनगाडी.. धुरांच्या रेषा हवेत सोडी..पळती गाडी पाहू या..मामाच्या गावाला जाऊ या..जाऊ या..’ हे अप्रतिम अजरामर बालगीतही आज  काळाच्या  पडद्याआड गेले आहे. झुक.. झुक.. करत मामाच्या गावाला जाणार्‍या आगीनगाडीच्या हवेतील रेषाही आता धुसर झाल्याने मामाचे गावही तरूण पिढी हरवत चालली आहे. आता सुट्टीतील मामाच्या गावातील गेले ते दिवस अन् राहिल्या त्या फक्‍त आठवणी, असेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
आधुनिकीकरणाचे अनुकरण करणार्‍या आजच्या युगात स्पर्धेच्या व धकाधकीच्या जीवनात देशी खेळांसह विविध अस्सल गावरान खेळांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. सध्याच्या संगणक, मोबाईल याच्या बेसुमार वापरामुळे मुलांना खेळायला, बागडायला वेळ मिळत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यासह विविध सोशल मीडियाचा अतिरेक होत आहे. याच्या वापरामुळे मुले एकाजागी खिळून राहू लागल्याने फेसबुक व सोशल मीडियाच्या आहारी गेली  आहेत.
सोशल मीडियावरील करमणुकीच्या साधनांमुळे तरूण निसर्गाचे सान्निध्य हरवून बसले आहेत. जंक व फास्ट फूडच्या जमान्यात मुलांना मामाच्या गावी जाणे व तेथील निसर्ग जवळून पाहणे, अनुभवणे, भटकंती करणे, विहिरीत मनसोक्‍त पोहणे, झाडावर चढणे, सूरपारंब्या, चकारीचा खेळ, गोट्या, लगोर हे देशी खेळ खेळणे आता आवडत नाही. मुलींनाही झिम्मा-फुगडीसारखे देशी खेळ व खेडेगाव अर्थात ग्रामीण भाग किंवा मामाचे गाव आवडत नाही.  कधी एकदाची सुट्टी लागते व मामाच्या गावाला जाऊन पायी चालून मामाचा गाव तुडवून काढतो, असे त्यांना वाटायचे.
आताची पिढी मात्र मामाच्या गावाला जाण्याऐवजी गोव्याच्या बिचवर  पडून राहणे पसंत करीत आहे. त्यामुळे आता मामाचे गाव व सुट्टीतील हुल्लडबाजी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. तरूण पिढीतील कसरतीच्या देशी खेळांची आवडही कमी होत चालली असून जीमकडे तरूणाईचा ओढा वाढला आहे.

No comments:

Post a Comment