Wednesday, April 24, 2019

राज्यातील दीड हजार गावे आणि चार हजार वाड्या वस्त्यांना पाणी टंचाईची झळ

जत,(प्रतिनिधी)-
पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्यातील  धरणांमधील पाण्याच्या साठ्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भीमा खोर्‍यातील 25 पैकी 15 धरणांमधील पाणीसाठा 20 टक्क्यांपेक्षा कमी झाला असून, कृष्णा खोर्‍यातील धरणांमध्येही पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे. या खोर्‍यातील 13 पैकी सुमारे सात धरणांमध्ये 30 टक्क्यांहून कमी पाणीसाठा उरला असल्याचे दिसून येत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील दोन्ही खोर्‍यांमध्ये एकूण सुमारे 38 धरणे आहेत; मात्र मागील सलग चार ते महिन्यांपासून अनिबर्र्ंध पाणी उपशामुळे पाणीसाठा हळूहळू कमी होत चालला आहे. मागील फेब्रुवारी, मार्च आणि सध्या सुरू असलेल्या एप्रिल महिन्याचा विचार करता उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे.
या भागात कमाल तापमानाचा पारा सलगपणे 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होण्याच्या प्रक्रियेचा वेग जास्त आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे. आगामी मे, जून आणि जुलै महिन्याचे 15 दिवस असा सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये उन्हाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे पाण्याची मागणी संबंधित भागातून वाढलेली दिसून येते. धरणामधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे अनेकदा ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते.
यावर्षी हवामान विभागाने मान्सूनच्या पहिल्या टप्प्याच्या अंदाजामध्ये केवळ 96 टक्‍के पाऊस पडेल असे सांगितले आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा पावसाचे प्रमाण कमीच राहील, असे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेता धरणांमध्ये पाणीसाठा शिल्लक ठेवणे अगर त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
राज्यात धरणांतील पाणीसाठा झपाट्याने खालवत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न उग्र बनणार आहे. मराठवाड्यातील धरणांत अवघा एक टक्का पाणीसाठा असून अन्य विभागांतही पाणीपातळी धरणांचा तळ गाठू लागली आहे. उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील मनमाड शहरात २५ दिवसांतून एकदा, तर जळगाव शहरात सात, धुळ्यात पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील भीमा आणि कृष्णा खोर्‍यातील ३८ धरणांपैकी भीमा खोर्‍यातील तब्बल नऊ, तर कृष्णा खोर्‍यातील एक धरण संपूर्ण रिकामे झाले आहे. या सर्व ३८ धरणांत सरासरी ३0 टक्के पाणीसाठा आहे. पाणीटंचाई असली तरी मराठवाड्यासह राज्यभरात उद्योगांना काही प्रमाणात कपात करुन पाणी दिले जात आहे, मात्र मराठवाड्यात मे महिन्यामध्ये उद्योगांचे पाणी थांबविण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ ३,0८,00,000 हेक्टर असून क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील भौगोलिक क्षेत्रफळ हे देशाच्या ९.३७ टक्के असून भारतातील एकूण जलसंपत्तीच्या १४.५९ टक्के पाणी महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहे. परंतु असे असले तरी राज्यात वारंवार जलसंकट निर्माण होत असून सध्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. मान्सून पर्जन्य हा महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा एकमेव स्त्रोत आहे परंतु महाराष्ट्राच्या पश्‍चिमेस असणार्‍या सह्याद्री पर्वत रांगांमुळे अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मान्सून वारे अडविले जातात त्यामुळे कोकण किनारपट्टीवर २000 ते ३५00 मि.मी पाऊस पडतो. तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस असणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भातील अनुक्रमे ५00 ते ७५0 मि.मी व १000 ते १४00 मि.मी.इतका अत्यल्प पाऊस पडतो. भारताच्या १४.५९ टक्के पाणी महाराष्ट्रात उपलब्ध असून देशाच्या तुलनेत २९.१0 टक्के वापरायोग्य पाणी एकट्या महाराष्ट्रात उपलब्ध आहे. याशिवाय गेल्या १00 वर्षातील पर्जन्याच्या आकडेवारीचा विचार केल्यास राज्यातील पावसाचे सरासरी प्रमाणे फारसे कमी झाल्याचे आढळून येत नाही. परंतु याच काळात देशातील लोकसंख्येत पाच पटींपेक्षा अधिक वाढ झाली तसेच शेती क्षेत्रातील हरितक्रांती, पायाभूत सुविधांचा विकास, औद्योगिक प्रगती यामुळे पाण्याची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढत गेली परंतु त्या प्रमाणात जलसंपत्तीचे नियोजन व व्यवस्थापन होऊ न शकल्याने अद्यापही महाराष्ट्रातील ८0 टक्के शेती ही कोरडवाहू स्वरूपाची आहे. याशिवाय राज्यातील १,५८६ गावे व ४,३0५ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. याउलट इस्त्राईल सारख्या देशात वार्षिक सरासरी केवळ ४ ते ५ इंच पाऊस पडूनही हा देश केवळ पाण्याच्या योग्य नियोजनामुळे सुजलाम सुफलामआहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील गावांत लोकांना पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी ४ - ५ मैलांपयर्ंत वणवण करावी लागते तर शहरांमध्ये आठवड्यातून कधी पंधरवड्यातून तर काही ठिकाणी महिन्यातून एकदा नळाला पाणी येते. याउलट राज्यातील पुण्यासारख्या शहरात दररोज दरडोई २५0 लिटर पाण्याचा वापर केला जातो.

No comments:

Post a Comment