Saturday, May 4, 2019

सांगली जिल्ह्यातील बहुतांश भाग तहानलेलाच

जत,(प्रतिनिधी)-
ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना सर्वत्र होरपळ सुरू आहे.सांगली जिल्ह्यातील जत,कवठेमहांकाळ, आटपाडी,दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या ताकारी, म्हैसाळ व टेंभू या योजनांवर हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र या योजनांच्या एकूण लाभक्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्रही ओलिताखाली आलेले नाही. जिल्हा तहानलेला असल्याचेच विदारक चित्र  आहे.जत तालुक्यातील सर्वाधिक गावे पाण्यापासून वंचित आहेत.

    चौथ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार ताकारी, टेंभू व म्हैसाळ योजनेवर 9 हजार 717 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यापैकी आत्तापर्यंत अंदाजे 50 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे.
काही योजनांचे काम गेल्या 30  वर्षांपासून सुरू आहे. यासाठी काही वर्षांच्या फरकाने शासनाकडून चार सुधारित प्रकल्प अहवाल तयार करून  कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ताकारी योजनेसाठी चौथ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार 1302.96 कोटी, टेंभूसाठी 4 हजार 815 कोटी तर म्हैसाळ योजनेसाठी 3600 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. कामाशिवाय या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा प्रशासकीय खर्चही करण्यात आला आहे.
या योजनांमधून जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील बहुतांश भाग ओलिताखाली येणार आहे. ताकारी योजनेच्या 27 हजार 400 हेक्टर लाभक्षेत्रापैकी आत्तापर्यंत 10 हजार 600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. टेंभूच्या 80 हजार हेक्टर लाभक्षेत्रापैकी 30 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. म्हैसाळ योजनेच्या 81 हजार 697 हेक्टर क्षेत्रापैकी 40 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. 
आघाडी सरकारच्या काळामध्ये पाणी योजनांची वीजबिले टंचाई निधीतून भरून योजना सुरू करण्यात येत होत्या. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शासनाने पाणी योजनांबाबत कठोर पण टिकाऊ धोरणाचा अवलंब केला. योजनांची वीजबिले टंचाई निधीतून न भरण्याचा निर्णय घेतला. त्यावर उपाय म्हणून शासनाने या पाणी योजनांबाबत 81:19 चा फार्म्युला अंमलात आणला.

त्यामुळे  वीजबिलापैकी  केवळ 19 टक्के एवढीच रक्कम शेतकर्‍यांच्या पाणीपट्टीच्या रकमेतून कपात करण्यात येणार आहे. थकीत वीजबिलासाठी वीजपुरवठा खंडित होण्याचे संकटही आता टळले आहे.

No comments:

Post a Comment